अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके
कोपरगाव :रविवार, दिनांक २२ जून २०२५ रोजी कोपरगाव तालुक्यातील वारी येथील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या वतीने एक विशेष स्वच्छता मोहीम मोठ्या उत्साहात आणि सेवाभावी वृत्तीने राबविण्यात आली.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीचा हा सलग २०१ वा आठवडा असल्याने, हा आठवडा विशेष संस्मरणीय करण्यासाठी समितीने योगीराज गंगागिरीजी महाराज आणि ब्रह्मलीन महंत नारायणगिरीजी महाराज यांच्या पदस्पर्शाने व वास्तव्याने पावन झालेल्या गोदावरी धाम, सरला बेट येथे स्वच्छता मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला होता.
“स्वच्छतेची वारी सद्गुरु गंगागिरीजी महाराजांच्या दरबारी” या प्रेरणादायी घोषवाक्याखाली सकाळी ८.३० वाजता मोहिमेची सुरुवात झाली व दुपारी १२ वाजेपर्यंत अविरतपणे स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेत मधुकर लक्ष्मण टेके, सरपंच सुरेश जाधव, रावसाहेब जगताप, धोंडीराम हिवरे, चंद्रकांत कवडे, चांगदेव शिरसाट, अशोक मलिक, गोरख जठार, नवनाथ कवडे, मधुकर ठोंबरे, रावसाहेब वाघ, रविंद्र टेके, संदिप गायकवाड ज्ञानेश्वर जाधव, पत्रकार प्रशांत टेके आदी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या उपक्रमात अकरा वर्षांची कु. प्रणाली टेके हि विशेष आकर्षण ठरली- लहान वय असूनही प्रणालीने मोठ्या उत्साहाने स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. प्रणालीने स्वतः हातात झाडू घेत मंदिराच्या पायऱ्या झाडल्या तसेच परिसरातील प्लास्टिक पिशव्या व मिनरल वॉटरच्या रिकाम्या बाटल्या उचलून स्वच्छता केली. तिच्या या कृतीचे सदस्यांनी व उपस्थित भाविकांनी विशेष कौतुक केले.
या वेळी प्रणालीने सांगितले, “स्वच्छतेचे महत्त्व बालपणापासून मनावर बिंबवले पाहिजे. आपले घर, आपला परिसर आणि आपले देवस्थान स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे.” प्रणालीचा हा संदेश सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.
या स्वच्छता मोहिमेत गोदावरी नदीपासून संरक्षण भिंतीपर्यंतचा परिसर, मंदिर परिसरातील प्रसाद, फुल, हार विक्रीच्या दुकानांचा परिसर, सिमेंट काँक्रीटने बनवलेला गोलाकार दर्शनी भाग, मंदिरात जाण्यासाठी असलेल्या मुख्य पायर्या तसेच मंदिरालगतचा संपूर्ण परिसर अत्यंत सेवाभावी वृत्तीने व उत्कृष्ट नियोजनबद्ध पद्धतीने स्वच्छ करण्यात आला.
गोदावरी धाम सराला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी मोहिमेचे विशेष कौतुक करत सर्व सदस्यांशी सविस्तर संवाद साधला. महाराजांनी या उपक्रमा बद्दल माहिती जाणून घेतली आणि समितीच्या या कार्याचे विशेष अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा ही दिल्या. यावेळी स्वतः महंत रामगिरी महाराजांनी सर्व सदस्यांसोबत स्मृतीचित्रे काढली.
महंत रामगिरी महाराजांनी समितीच्या सर्व सदस्यांना संस्थानच्या वतीने दिला जाणारा महाप्रसाद ग्रहण करण्याचा आग्रह केला.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे सर्व सदस्यांनी अतोनात मेहनत घेतली.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी सातत्याने स्वच्छता राखण्याची व परिसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घेतली.
या उपक्रमाने ग्रामस्वच्छतेच्या चळवळीला नवी दिशा दिली असून, लहानग्या प्रणालीच्या सहभागाने पुढील पिढीसाठी स्वच्छतेचा आदर्श निर्माण झाला आहे.