अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
नाशिक प्रतिनिधी : त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या झी २४ तासचे ब्युरो चीफ योगेश खरे, साम टीव्हीचे ब्युरो चीफ अभिजित सोनवणे आणि पुढारी न्यूजचे ब्युरो चीफ किरण ताजने या तिघा पत्रकारांवर स्वामी समर्थ केंद्राजवळील पार्किंगवर काम करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांनी एकामागोमाग एक दगड, लाथा-बुक्क्यांनी भीषण हल्ला केला. या हल्ल्यात किरण ताजने गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पत्रकारांवर वारंवार होणारे हल्ले ही लोकशाहीला काळिमा फासणारी आणि चौथ्या स्तंभावर घाला घालणारी निंदनीय कृत्ये आहेत. पत्रकार समाजासाठी, सत्यासाठी आणि लोकशाहीच्या बळकटीसाठी अहोरात्र काम करतात. अशा पत्रकारांवर गुंड प्रवृत्तीने केलेले हल्ले कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत.
व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून प्रशासनाने संबंधित गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा कोणीही पत्रकारांवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे.