अहिल्यनगर मराठी न्यूज
सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर ओसरला असून बऱ्याच ठिकाणी आकाश स्वच्छ दिसत आहे. पावसाने काही दिवसांपूर्वी दमदार हजेरी लावली होती, त्यामुळे अनेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे आणि काही ठिकाणी पाण्याचा विसर्गही सुरू आहे. मात्र आता शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच प्रश्न पडतोय की पुढचा जोरदार पाऊस कधी येणार?
या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी २२ जून रोजी दिलेला ताजा हवामान अंदाज खूप महत्त्वाचा आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार पुढील काही दिवस पावसाचे स्वरूप संमिश्र राहणार आहे. राज्यात सर्वदूर पाऊस पडेल अशी शक्यता कमी असून, ठराविक भागांतच मध्यम ते जोरदार सरींचा अंदाज वर्तवला गेला आहे.
कोकणात सतत पाऊस
पंजाबराव डख म्हणतात की, कोकणात पाऊस थांबणार नाही. तसेच सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्येही पावसाच्या जोरदार सरी सुरू राहतील. या भागांमध्ये हवामान खात्याने आधीच अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
२२ आणि २३ जून दरम्यान विदर्भातील अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, वाशिम, बुलढाणा, हिंगोली, नांदेड आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. मात्र, हा पाऊस संपूर्ण जिल्ह्यात न पडता काही निवडक भागांतच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठवाड्यात विखुरलेला पाऊस
२३ ते २५ जून दरम्यान धाराशिव, लातूर, परभणी, बीड, नांदेड या जिल्ह्यांमध्ये थोड्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे. पण इथेही पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील. काही भागांत सरी पडतील, तर काही ठिकाणी पावसाचे चिन्हं नसेल.
वार्यांमध्ये बदल – चांगल्या पावसाची चाहूल?
राज्याच्या अनेक भागांत सध्या जोरदार वारे वाहत आहेत. याबाबत पंजाबराव डख म्हणतात की, २५ जूनपासून काही भागांत हे वारे थांबतील आणि २६ जूननंतर संपूर्ण राज्यात वार्याचा जोर कमी होईल. हे वारे थांबल्यानंतरच राज्यात पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल, असे त्यांनी विशेषतः सांगितले आहे.