अहिल्यानगर मराठी न्यूज पाथर्डी प्रतिनिधी चंद्रकांत वाखुरे
पाथर्डी : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या घरकुलाच्या बांधकामासाठी मुरूम व वाळू नेल्याच्या कारणावरून कारवाई न करण्यासाठी ५० हजारांची लाच घेताना तलाठी व खाजगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांनी रंगेहाथ अटक केली. ही धडक सापळा कारवाई गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) सायंकाळी पाथर्डी तालुक्यात करण्यात आली.
याप्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार (वय २६) हे अहिल्यानगर येथील रहिवासी असून त्यांचे वडील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर घरकुलाचे बांधकाम करत होते. सदर बांधकामासाठी त्यांनी नदीपत्रातून मुरूम व जाडसर वाळूच्या दोन गाड्या आणून घरकुलाच्या जागेवर उतरवलेल्या होत्या. यासाठी त्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या जेसीबी व ट्रॅक्टरचा वापर केला होता.
घटनास्थळी रात्री सतीश रखमाजी धरम (वय ४०, तलाठी सजा आडगाव, चार्ज तिसगाव, पाथर्डी) आणि नायब तहसीलदार सानप यांनी पाहणी केली. पाहणीनंतर तलाठी धरम यांनी तक्रारदारास अवैध गौण खनिज वाहतुकीच्या कारवाईचा इशारा देत, ती कारवाई टाळण्यासाठी नायब तहसीलदार यांना ५० हजार रुपये देण्याची मागणी केली.
तक्रारदाराने ही माहिती तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर यांना दिल्यानंतर पोलीस उप अधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला. १ ऑगस्ट रोजी तक्रारदाराकडून ५० हजार रुपये घेताना तलाठी सतीश धरम आणि त्याचा साथीदार अक्षय सुभाष घोरपडे (वय २७, रा. शिंगवे केशव) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाच रक्कम धरम यांनी स्वीकारून घोरपडे याच्याकडे सुपूर्द केली होती.
सदर प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, हॅश व्हॅल्यू व अन्य साक्षीपुरावे संकलित करण्यात आले आहेत. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. भारत तांगडे (ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र) व अप्पर पोलीस अधीक्षक मा. माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा कारवाई पथकात पोलीस कॉन्स्टेबल रवी निमसे, बाबासाहेब कराड आणि चालक पो.ह. हारून शेख यांचा समावेश होता.