अहिल्यानगर मराठी न्यूज : चंद्रकांत वाखूरे
पाथर्डी: शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील शेवगाव-गेवराई रस्त्यावर असलेल्या पद्मिनी मेडिकलमध्ये बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करत सुमारे ६० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी चापडगावचे रहिवासी आणि वैद्यकीय व्यावसायिक डॉ. ज्ञानेश्वर अंबादास दहिफळे (वय ३६) यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चापडगाव येथे डॉ. दहिफळे यांचे हॉस्पिटल आणि त्यासमोरच पद्मिनी मेडिकल स्टोअर्स असून, नागपंचमीच्या दिवशी हॉस्पिटल बंद असल्याने मेडिकल चालक संजय वंजारी यांनी दुपारी तीनच्या सुमारास मेडिकल बंद करून घरी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी आले असता शटरचे दोन्ही कोंडे तोडलेले दिसून आले. दुकानात प्रवेश केल्यावर संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले आणि गल्ल्यातील दोन दिवसांची रोख २८००० रुपये व इतर वैद्यकीय सामग्री चोरीस गेली असल्याचे आढळून आले.
तत्काळ मेडिकलमध्ये लावलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता बुधवारी रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान तीन अज्ञात चोरटे तोंडाला कपडा बांधून, हत्यारे घेऊन दुकानात प्रवेश करताना स्पष्टपणे दिसले. या चोरट्यांनी व्यवस्थितपणे मेडिकलमध्ये प्रवेश करून रोख रक्कम आणि इतर साहित्य चोरून नेले. या घटनेमुळे चापडगाव परिसरात एकच खळबळ उडाली असून वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी डॉक्टर दहिफळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सचिन नवगिरे करत आहेत. चोरीच्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रात्री गस्त वाढवण्याची मागणी केली असून गावात मुख्य चौक व व्यावसायिक भागात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचीही गरज व्यक्त केली आहे.
रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या वैद्यकीय दुकानावर झालेल्या या चोरीने संपूर्ण परिसरात चिंता निर्माण झाली आहे. पोलीस प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून चोरट्यांना अटक करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.