अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
वारी येथे श्री तुलसी रामायण कथामालेचा उत्साहात शुभारंभ – भाविक मंत्रमुग्ध होऊन ज्ञानयज्ञात उत्साहात सामील
कोपरगाव प्रतिनिधी (प्रशांत टेके) : कोपरगाव तालुक्यातील वारी येथे दि. गोदावरी बायोरिफायनरी लिमिटेड कंपनीच्या कामगारांच्या वतीने गणेशोत्सव निमित्त सात दिवसीय श्री तुलसीरामायण कथा भक्तिभावाने सुरू झाली. या कथामालेच्या पहिल्या पुष्पाचा शुभारंभ दि. २७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ठिक ७.३० वाजता विधीवत पूजन करून करण्यात आला. कोणत्याही मंगल कार्याचा प्रारंभ श्रीगणेश पूजनानेच व्हावा या परंपरेनुसार प्रथम श्रीगणेशाची आराधना करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.
या प्रसंगी रामायणाचार्य ह.भ.प. रामराव महाराज ढोक यांनी मार्गदर्शन करताना महंत वै. डोंगरे महाराजांच्या कीर्तनातील एक महत्त्वपूर्ण प्रसंग विशद केला. ते म्हणाले – “कितीही मोठा नेता असला तरी त्याला नारदाच्या गादीवर जाण्याचा अधिकार नाही. नारदाचीगादी ही सत्ता वा प्रतिष्ठेची नसून भक्ती, ज्ञान आणि त्यागाची आहे.” त्यांच्या या महत्वपूर्ण वाक्याला उपस्थित भाविकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पहिल्या पुष्पात महाराजांनी महादेवाचा जीवनपट सोप्या आणि समजण्यासारख्या शैलीत सादर केला. त्यांनी शंकर–पार्वती विवाहाची हृदयस्पर्शी मांडणी करून वातावरण भावनिक आणि भक्तिरसपूर्ण केले. या प्रसंगी गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील असंख्य भाविक मंत्रमुग्ध होऊन रामकथेत तल्लीन झाले.
कार्यक्रमाची सांगता प्रभू श्रीरामचंद्रांच्या आरतीने झाली. ही आरती कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुहास गोडसे यांनी सपत्नीक करून पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची मंगल सांगता घडवली.
संपूर्ण वारी परिसर या कार्यक्रमामुळे भक्तिरसाने ओथंबून गेला असून पुढील सहा दिवस विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी गाव भक्तिमयतेत रंगणार आहे.