अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
राहूरी प्रतिनिधी : मुख्यमंत्री पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून गावखेड्यातील विकासकामांना नवी गती मिळणार असून या लोकाभिमुख अभियानामुळे गावांचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असे प्रतिपादन राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहूरी तालुक्यातील गनेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार कर्डिले म्हणाले की, “हे अभियान गावोगावी विकासाची नवी दिशा देणार आहे. गावातील प्रत्येक घटक एकत्रित आल्यास विकासाची गती वाढेल. गणेगाव आधीच आदर्श गाव म्हणून ओळखले जाते, मात्र या अभियानामुळे गाव अधिक स्वच्छ, जलसमृद्ध व विकासाभिमुख होईल. ग्रामविकासासाठी आवश्यक अनेक योजना थेट जनतेच्या दारी पोहोचतील. त्यासाठी मी स्वतः कटिबद्ध राहीन.”
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोपट भाऊसाहेब कोबरणे होते. व्यासपीठावर भाजपा जिल्हा सरचिटणीस अमोल भनगडे, गटविकास अधिकारी सुरेश तायडे, तलाठी प्रदीप पवार, पंचायत समिती स्वच्छता अभियान अधिकारी श्री. बेल्हेकर, कृषी सहायक अंत्रे, प्रवीण गायकवाड, भाऊसाहेब राऊत, अर्चना हारदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल भनगडे यांनी केले. सूत्रसंचालन सतीश कोबरणे यांनी केले तर आभार विकास कोबरणे यांनी मानले.
शुभारंभ सोहळ्यासाठी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सरपंच शोभा भनगडे, उपसरपंच भाऊसाहेब कोबरणे, तसेच बाबासाहेब, साहेबराव, लविकास, बाळासाहेब, अशोक, कैलास, प्रवीण, राजेंद्र कोबरणे यांच्यासह ग्रामस्थ महिला व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता.