अहिल्यानगर मराठी न्यूज :प्रशांत टेके
कोपरगाव तालुक्यात गुरुवारी रात्री अचानक आलेल्या जोरदार वादळाने तालुक्यात मोठे नुकसान घडवले. या वादळामुळे अनेक ठिकाणी प्रचंड मोठी झाडे उन्मळून पडली, तर विजेचे खांब कोसळून विजवाहक ताराही तुटल्या. परिणामी, गुरुवारी रात्रीपासून संपूर्ण परिसरातील वीज पुरवठा पूर्णतः खंडित झाला असून, शुक्रवार दिवसभर नागरिकांना अंधारात दिवस काढावा लागला.
वादळाचा जोर इतका होता की शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळीवरील पत्रे उडून गेले, त्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांच्या घरांनाही वादळाचा जबरदस्त फटका बसला असून, काही घरे आंशिक तर काही घरे पूर्णतः कोसळली आहेत.
या आपत्तीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विजेच्या खांबांच्या कोसळण्यामुळे वीज वितरण व्यवस्थाही पूर्णतः कोलमडली आहे. वीज वितरण कंपनीकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे, मात्र वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायती आणि आपत्ती व्यवस्थापन आदींनी पंचनामे सुरु करण्याचे गरजेचे आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या झालेल्या नुकसानीसाठी मदतीची मागणी केली आहे.