अहिल्यानगर मराठी न्यूज – प्रशांत टेके
कोपरगाव: तालुक्यातील वारी येथे रविवार दि. १५ जून २०२५ रोजी गावासाठी सामाजिक जाणीव आणि स्वच्छतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत, श्री संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान समिती व जय बाबाजी भक्त परिवार यांनी आज ग्राम स्वच्छता अभियान मोहीमेचा २०० व्या आठवड्यांचा मोठा टप्पा पूर्ण केला आहे. ग्रामस्वच्छता समितीच्या निस्वार्थी व प्रामाणिक सदस्यांनी सामुदायिकपणे केलेल्या प्रयत्नांमुळे ही मोहीम यशस्वी झाली आहे . तसेच ही स्वच्छता मोहीम यापुढेही अखंडपणे चालविण्याचा समितीतील प्रत्येक सदस्याचा मानस आहे. वारीगावच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीचे समाजपयोगी कार्य परीसरातील युवकांना प्रेरणादायी ठरत आहे.
आज ग्राम स्वच्छता अभियानाच्या २०० व्या आठवड्यांत श्री रामेश्वर विद्यालय व जि.प. प्राथमिक मराठी शाळा, वारीगांव या ठिकाणीचा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला. मोहीमे दरम्यान शाळेच्या आजूबाजूच्या परिसरातील कचरा उचलून परिसर स्वच्छ व सुस्थितीत ठेवण्याचे कार्य करण्यात आले. दोन्हीही शाळा दि. १६ जुन रोजी सुरू होणार असल्याने २०० व्या आठवड्यांत पदार्पण करताना हे विशेष ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले .
स्वच्छता दुत आणि कार्यकर्ते:
या उपक्रमात मधुकर टेके (शिवसेना अध्यक्ष, वारी) यांच्या नेतृत्वाखाली खालील ग्रामस्थांनी सहभाग घेतला:सुरेश जाधव, माजी सरपंच नवनाथ कवडे, चंद्रकांत कवडे,आप्पासाहेब टेके,ज्ञानेश्वर जाधव,अशोक मलीक, चांगदेव शिरसाट,धोंडीराम हिवरे,विलास गाडेकर, नाना जठार,गागरे मामा,रावसाहेब जगताप,रावसाहेब वाघ,मधुकर गायकवाड आदी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने व निःस्वार्थ भावनेने काम केले. या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या योगदानामुळेच आज वारीगांवचा परिसर अधिक स्वच्छ व सुंदर दिसत आहे.
ग्रामस्वच्छता हे एक पवित्र कार्य –
“गाव सेवा हीच खरी ईश्वर सेवा” या संकल्पनेतून प्रेरणा घेत, सर्व स्वच्छता दुतांनी गावाची सेवा करत राहण्याचा निर्धार व्यक्त केला. “कोणी असो किंवा नसो, आपण आपले कर्म करत राहणार” ही त्यांची सकारात्मक वृत्ती गावातील तरुणांसाठी देखील प्रेरणादायी ठरली आहे.
वारीगांव ग्रुप हा केवळ काही व्यक्तींपुरता मर्यादित नसून, हा ग्रुप संपूर्ण गावासाठी खुला आहे. कोणताही इच्छुक ग्रामस्थ या ग्रुपमध्ये सहभागी होऊ शकतो व गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान देऊ शकतो.
भविष्यातील योजना:-
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीचे पुढील उद्दिष्ट म्हणजे ग्रामस्वच्छतेसह वृक्षारोपण, प्लास्टिक मुक्त गाव, जलस्वच्छता व सार्वजनिक ठिकाणांच्या सौंदर्यीकरणासाठी विशेष उपक्रम राबवणे.
संपूर्ण गावाने या अभियानाला मिळवून दिलेले पाठबळ हेच या उपक्रमाचे खरे यश आहे.
वारीगांव ग्रामस्थांच्या सामाजिक जाणीवेचे व एकतेचे हे उत्कृष्ट उदाहरण संपूर्ण कोपरगाव तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. वारीगाव संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानची २०१ वा आठवडा गोदावरी धाम सरालाबेट या ठिकाणी साजरा करण्यात येणार आहे “. रविवार दिनांक २२ जुन २०२५ रोजी एकादशीच्या पावन पर्वा वर सद्गुरू गंगागिरी महाराज , ब्रम्हलिन महंत नारायण गिरी महाराज आदी संतांच्या पावन स्पर्शाने व वास्तव्याने पुनीत झालेल्या गोदावरी धाम सरालाबेटच्या संपुर्ण परीसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे आणि मोहिमेचा २०१ वा आठवडा असेल अशी माहिती वारीगाव संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.