अहिल्यानगर मराठी न्यूज : चंद्रकांत वाखूरे
पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर
पाथर्डी : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी गावात येणाऱ्या बळखंडी बाबा यात्रेनिमित्त शांतता व सुव्यवस्थेसाठी गावात शांतता समितीची एक प्रभावी व सर्वसमावेशक बैठक पार पडली. या बैठकीला हिंदू-मुस्लिम समाजातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, गावातील प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस प्रशासनाचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचा उद्देश यात्रेदरम्यान शांतता, सलोखा व धार्मिक सौहार्द राखणे हा होता.
या बैठकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते पाथर्डी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष व लोकाभिमुख पोलीस निरीक्षक श्री. विलास पुजारी साहेब यांनी.
त्यांच्या संयमी, दूरदृष्टीपूर्ण आणि मार्गदर्शक नेतृत्वामुळे संपूर्ण बैठक अत्यंत सकारात्मक वातावरणात पार पडली. पुजारी साहेबांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधत कायदासुव्यवस्था, अफवांपासून दूर राहणे, समाजमाध्यमांचा जबाबदारीने वापर, आणि यात्रेतील संभाव्य आव्हानांवर उपाय याविषयी परखडपणे मते मांडली.
गावकऱ्यांनी देखील पुजारी साहेबांच्या कार्यशैलीचे विशेष कौतुक करत, त्यांच्या नेतृत्वाखाली बळखंडी बाबा यात्रा शांततेत, आनंदात आणि कोणताही अनुशासनभंग न करता पार पडेल याबाबत विश्वास दिला.
या बैठकीस पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण पवार, हेड कॉन्स्टेबल सुहास गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल चाळक यांचीही उपस्थिती होती.
बैठकीत हिंदू-मुस्लिम समाजातील मान्यवरांनी उपस्थितांना आवाहन केले की, धर्म, जात, भाषा हे भेद विसरून आपण सारे ‘माणिकदौंडीकर’ एकत्र राहूया. गावचा मान आणि यात्रेचा लौकिक अबाधित राहावा यासाठी प्रत्येकाने सजग नागरिकाची भूमिका बजावावी.
यात्रेदरम्यान पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही, गस्त, वाहतूक नियंत्रण, अशा विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी स्वतंत्र महिला पोलीस यंत्रणा कार्यरत राहणार आहे.
माणिकदौंडी गावाने सामाजिक ऐक्याचे आणि धर्मनिरपेक्षतेचे जे उदाहरण या बैठकीत घालून दिले, ते संपूर्ण पाथर्डी तालुक्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय हा अशा बैठकीतून अधिक मजबूत होत असून, पुजारी साहेबांसारखे अधिकारी ग्रामीण भागातही सामंजस्याचा प्रकाश पसरवत आहेत, हे विशेष उल्लेखनीय आहे.