अहिल्यानगर मराठी न्यूज :संपादक शहाजी दिघे
एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांचे आवाहन
राहूरी : चोरीच्या गाड्या शोधण्यासाठी राहुरी पोलीस स्टेशन यांचेकडून राबवलेल्या विशेष मोहिमेत विना नंबर प्लेटच्या ५५ मोटर सायकलवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान ९ वाहन चालकांनी त्यांची कागदपत्रे सादर न केल्याने ही संशयास्पद वाहने पोलिस स्टेशनला जमा आहेत. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत चोरांकडून अल्प दरात मोटरसायकल विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जात असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी देवदत भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, उपनिरीक्षक राजू जाधव, विष्णू आहेर, सहाय्यक फौजदार आव्हाड, कॉन्सटेबल संतोष ठोंबरे, बापू फुलमाळी, गणेश लिपने, शेषराव कुटे, इफ्तेखार सय्यद् अमोल भांड, प्रमोद ढाकणे, सचिन ताजने,जालिंदर साखरे, सतीश कुऱ्हाडे, कोळी या पोलिस पथकाकडून शनिवारी विना नंबर प्लेट मोटरसायकल तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात ५५ दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली. पैकी ४६ वाहनांवर कारवाई करून २५ हजार ७५० रुपये दंड वसूल करण्यात आला. कारवाई नंतर नंबर प्लेट बसवून मोटरसायकल मालकाच्या ताब्यात देण्यात आल्या. नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे. वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम मालकांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली. नागरिकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांवर पुढील व मागील बाजूस एच एस आर पी नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही. नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणे सोप होईल, असे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी सांगितले.