September 19, 2025 3:23 pm

भाजपने उपराष्ट्रपतीपदासाठी महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाची केली घोषणा

अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे

अहिल्यानगर : भाजपने महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे नाव उपराष्ट्रपतीपदा साठी निश्चित केले आहे. ते एनडीएचे उमेदवार असणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी नाव जाहीर केले आहे.

जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी आता निवडणुका होणार आहे. त्यासाठी भाजपने त्यांच्या उमेदवाराचे नाव निश्चित केले आहे. आता इंडिया आघाडी काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सी.पी. राधाकृष्णन यांचा संक्षिप्त परिचय

श्री सी. पी. राधाकृष्णन यांनी ३१ जुलै २०२४ रोजी महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली. महाराष्ट्रात राज्यपालपदी नियुक्ती होण्यापूर्वी ते झारखंडचे राज्यपाल होते. आपल्या राज्यपाल पदाच्या कालावधीत त्यांनी तेलंगणा राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल म्हणून देखील अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

श्री. राधाकृष्णन हे चार दशकांपासून तामिळनाडूचे राजकारण तसेच सार्वजनिक जीवनातील एक सुपरिचित व्यक्तिमत्व राहिले आहे. त्यांचा जन्म ४ मे १९५७ रोजी तिरुपूर, तमिळनाडू येथे झाला आणि त्यांनी व्यवसाय प्रशासनात पदवी प्राप्त केली. सन १९९८ मध्ये ते पहिल्यांदा कोईम्बतूरमधून लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर १९९९ साली ते तेथूनच पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून गेले.

आपल्या खासदारकीच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी वस्त्रोद्योग संबंधी संसदीय स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषविले. सार्वजनिक उपक्रमांसाठी (पीएसयू) संसदीय समितीचे आणि अर्थ विषयक संसदीय सल्लागार समितीचे देखील ते सदस्य होते. स्टॉक एक्स्चेंज घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या संसदीय विशेष समितीचे देखील ते सदस्य होते.

सन २००४ मध्ये श्री.राधाकृष्णन यांनी संसदीय शिष्टमंडळाचे सदस्य म्हणून संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित केले. तैवानच्या दौऱ्यावर गेलेल्या पहिल्या भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे देखील ते सदस्य होते.

सन २०१६ मध्ये श्री. राधाकृष्णन यांची कॉयर बोर्ड, कोचीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. हे पद त्यांनी चार वर्षे सांभाळले होते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशातील कॉयरची निर्यात २५३२ कोटी रुपये या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.

दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी श्री. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या पहिल्या चार महिन्यांतच त्यांनी झारखंडमधील सर्व २४ जिल्ह्यांना भेटी दिल्या तसेच नागरिक आणि जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. आपल्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळात त्यांनी तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपाल पदाचा देखील काही काळ अतिरिक्त कार्यभार सांभाळला.

उत्तम क्रीडापटू असलेले राधाकृष्णन हे टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते तसेच ते लांब पल्ल्याचे धावपटू होते. क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये त्यांना रुची आहे. श्री. राधाकृष्णन यांनी अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन, पोर्तुगाल, नॉर्वे, डेन्मार्क, स्वीडन, फिनलंड, बेल्जियम, हॉलंड, तुर्की, चीन, मलेशिया, सिंगापूर, तैवान, थायलंड, इजिप्त, संयुक्त अरब अमिरात, बांग‌्लादेश, इंडोनेशिया आणि जपान या देशांना भेटी दिल्या आहेत.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें