अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
राहूरी: राहुरी तालुका फोटोग्राफर सामाजिक संस्थेच्या वतीने जागतिक छायाचित्रण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राहुरी येथील पांडुरंग लॉन्समध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे संजय ठेंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून झाली. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व छायाचित्रकारांसोबत पांडुरंग लॉन्समध्ये बिल्व वृक्षाचे रोपण केले. वृक्षारोपणादरम्यान पी. आय. ठेंगे यांनी स्वतः कॅमेरा घेऊन छायाचित्रकारांचे फोटो टिपले आणि सर्वांची मने जिंकली. त्यानंतर सौ. गुलदगड यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे औक्षण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.या कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते कॅमेरा पूजन करण्यात आले. संस्थेचे संचालक मंगेश गाडेकर यांनी जागतिक छायाचित्रण दिनाचे महत्त्व सांगितले, तर सचिव गणेश नेहे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. संस्थेच्या वतीने पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि अध्यक्ष राजेंद्र आढाव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचाही सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमात ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश देत वृक्षसंवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यात आले. पांडुरंग लॉन्सचे संचालक हर्षल शेटे पाटील, आचारी अंबादास दुधाळ आणि वृक्षमित्र सुनील बेंद्रे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे संजय ठेंगे यांनी आपल्या भाषणात, पोलीस आणि छायाचित्रकारांचे काम सारखेच असून दोघांनाही समाजासाठी परिश्रम घ्यावे लागतात, असे सांगितले. तसेच, त्यांनी डीजे, मंगल कार्यालये आणि छायाचित्रकारांना रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रम बंद करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. नुकत्याच झालेल्या एका छायाचित्रकाराच्या अपघाती निधनाबद्दल संस्थेने श्रद्धांजली वाहिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब ढोकणे यांनी केले, तर सहसचिव दीपक गुलदगड यांनी आभार मानले. ज्येष्ठ छायाचित्रकार आणि पत्रकार ह.भ.प. राजेंद्र आढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर आपना टिके, भानुदास शेलार, बाबासाहेब सूर्यवंशी, सुभाष कोंडेकर, भाऊसाहेब विटनोर, जालिंदर मुसमाडे, गायकवाड मामा, प्रकाश बोबडे, दादा माने, सुभाष दहाट, भरत दिघे, राजू भोरे, ज्येष्ठ पत्रकार वसंतराव झावरे, संगम ऑडिओचे बाळासाहेब लगे, काशीद मंडपचे तात्या काशीद आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाला विविध तालुक्यांमधून मोठ्या संख्येने छायाचित्रकार उपस्थित होते. सर्वांसाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली