अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
धानोरे (वार्ताहर)- राहुरी तालुक्यातील श्रीक्षेत्र धानोरे घाट येथे अंबिका माता व कळमजाई माता अखंड हरिनाम शारदीय नवरात्र उत्सव बाळकृष्ण महाराज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भजनी मंडळ, धनेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या सहकार्याने सोमवार २२ सप्टेंबर ते गुरुवार २ ऑक्टोबर अखेर आयोजित केला आहे. तसेच घटस्थापनेच्या मुहूर्तावर दत्तगिरी महाराज उंबरेश्वर यांच्या हस्ते कलशारोहण सोहळा होणार आहे.
यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. अखंड हरिनाम शारदीय नवरात्र उत्सवाचे हे ३८ वे वर्ष आहे. उत्सव काळात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
२२ रोजी सकाळी कलशाची मिरवणूक होणार आहे, सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ, सकाळी व सायंकाळी साडेसहा वाजता पंचोपचार पूजा व देवीची आरती तसेच सायंकाळी सात ते नऊ कीर्तन होईल. घटस्थापनेच्या मुहूर्तावर मंदिरावरील कलशारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. देवीचा गोंधळ, सुशाबाई भालेराव व सहकारी रामपूर, गुरुदेव महाराज धारणगावकर, महेश महाराज रिंधे, विश्वनाथ महाराज गिरी, संदीप महाराज खंडागळे, अरुण महाराज दिघे, निलेश महाराज कोरडे, बालयोगी अमोल महाराज जाधव, राधिका करंजीकर,भाऊसाहेब महाराज काळे, जयश्री तिकांडे यांचे हरिकीर्तन होणार आहे. दि. १ ऑक्टोबर सकाळी अंबिका माता प्रतिमेची मिरवणूक होईल. त्यानंतर बाळकृष्ण महाराज कांबळे यांचे काल्याचे कीर्तन व महाप्रसादाचे वाटप होणार आहे. तरी नवरात्र उत्सव काळात होणाऱ्या कीर्तन श्रवणाचा परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शारदीय नवरात्र उत्सव समिती धानोरे, धनेश्वर देवस्थान ट्रस्ट, अंबिका माता भजनी मंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.