पाथर्डी :अक्षय वायकर
पाथर्डी, दि. १२ फेब्रुवारी – जिल्हा परिषद प्राथमिक उर्दू शाळा, पाथर्डी येथे विद्यार्थ्यांनी ‘खाद्य बाजार’ आयोजित करून अनोखा उपक्रम सादर केला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ तयार करून त्यांची विक्री केली.
विद्यार्थ्यांनी स्वयंपाक कौशल्य, विक्री तंत्र आणि ग्राहक सेवा याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. त्यांनी खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करून ग्राहकांना आपल्या स्टॉलकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याध्यापिका सय्यद परवीन मॅडम आणि उपमुख्याध्यापिका शेख कौसर मॅडम यांच्या हस्ते संपन्न झाले. या वेळी शिक्षिका शेख तहेसीन मॅडम, प्रशिक्षणार्थी पूजा मॅडम आणि सेविका बिल किस पिंजारी मॅडम उपस्थित होत्या.
मुख्याध्यापिका सय्यद परवीन मॅडम म्हणाल्या, “विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता वृत्ती विकसित व्हावी आणि स्वावलंबनाचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे.”
शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणारा हा उपक्रम भविष्यात अधिक व्यापक प्रमाणात राबवावा, अशी मागणी उपस्थितांनी केली.