September 20, 2025 9:50 am

महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून दर्जेदार आरोग्यसेवा मोफत मिळतील – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे

अहिल्यानगर, दि. ८ – समाजातील गोरगरिबांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतून ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्यसेवा मोफत मिळतील, अशी सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा अधिकाधिक लाभ नेवासा परिसरातील नागरिकांनी घ्यावा, तसेच त्यांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, असा विश्वास जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

नेवासा येथील प्रायमस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व नेफ्रोलाइफ डायलिसिस केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. 

पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, “नेवासा ही संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असून तालुक्याला महान अध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे. ‘संत ज्ञानेश्वर सृष्टी’ प्रकल्प जलसंपदा विभागामार्फत हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत घाट, पूल व रस्त्यांची निर्मिती करत मंदिर परिसराचा सर्वसमावेशक विकास करण्यात येणार आहे.”

 “जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने नुकतेच जलपूजन पार पडले. धरणातील कालव्यांद्वारे वाहणाऱ्या पाण्यापैकी सुमारे ४० टक्के पाणी वाया जात होते. ही गळती थांबवण्यासाठी कालव्यांच्या लाईनिंगसाठी ८०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मुळा धरणात २ टीएमसीपर्यंत गाळ जमा झालेला असून तो काढण्यासाठी व फ्लॅप बसविण्यासाठीही मंजुरी दिली आहे. त्यामुळे साठवण क्षमता २ ते ३ टीएमसीने वाढणार आहे. याचा थेट लाभ नेवासा व राहुरी तालुक्यांना मिळणार आहे.”

मधमेश्वर येथील बंधाऱ्याची क्षमता दीडपट करण्याचे काम हाती घेण्यात आले असून बॅकवॉटरमधील पाण्याचा शेतीस मोठा फायदा होईल. नेवासा शहरातील सांडपाणी थेट नदीत जाऊ नये, यासाठी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या सूचना नगरपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

नेवासा येथे सुमारे साडेसात कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व शुभारंभ करण्यात आले. दीड कोटी रुपये खर्चून उपनिबंधक कार्यालयाची उभारणी करण्यात आली असून १९ कोटी रुपयांच्या माध्यमातून पोलीस ठाणे व पोलीस वसाहतीचे काम सुरू आहे. विकासपर्वाची ही सुरुवात असून सर्वसामान्य नागरिक केंद्रस्थानी ठेवून शासन विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याच्या प्रयत्नात आहे, असे पालकमंत्री श्री.विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

आमदार श्री.लंघे म्हणाले, “नेवासा तालुक्याचा विकासाचा बॅकलॉग आजही प्रलंबित आहे. मात्र साडेसात कोटी रुपयांच्या विकासकामांद्वारे या विकास पर्वाची सुरुवात झाली आहे. पालकमंत्री विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यात येईल”

कार्यक्रमास याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, उद्धव महाराज मंडलिक, किसन पाटील, प्रभाकर शिंदे, ह.भ.प. अंकुश महाराज जगताप, नितीन दिनकर, किसनराव गडाख, डॉ. निलेश लोखंडे, शंकरराव लोखंडे, रेश्मा लोखंडे आदी उपस्थित होते तसेच पदाधिकारी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा