September 19, 2025 5:25 pm

एआय च्या मदतीने ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर करडी नजर ठेवली जाणार 

अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे

गावातील सरपंचापासून ते ग्रामसेवकापर्यंत आता सर्वांवर असणार केंद्र सरकारची नजर सरकारचा ऐतिहासिक निर्णय

केंद्र सरकारने सभासार प्रणाली केली लॉन्च  

अहिल्यानगर : नव्या प्रणालीचा  १५ ऑगस्ट पासून अर्थातच स्वातंत्र्य दिनापासून शुभारंभ झाला असून या नव्या प्रणालीमुळे ग्रामीण शासन व्यवस्थेत पारदर्शकता येणार असल्याचा विश्वास व्यक्त होतोय.

 ग्रामपंचायतीत सरपंचाकडून तसेच तेथील ग्रामसेवकांकडून मनमानी कारभार चालवला जातोय असा आरोप सातत्याने केला जातो. गावागावांमध्ये असे प्रकार बिनधास्त सुरू आहेत. या लोकांना शासनाचा अजिबात वचक राहिलेला नाही. काही गावांमध्ये ग्रामसभाच घेतल्या जात नाहीत. ग्रामसभा फक्त कागदावर राहते. मात्र आता यापुढे अशी कोणतीच घटना होणार नाही. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच एआय च्या मदतीने ग्रामपंचायत आणि पंचायत समितीच्या कारभारावर करडी नजर ठेवली जाणार आहे.

यासाठी केंद्र सरकारने सभासार ही नवीन प्रणाली लॉन्च केली आहे. या नव्या प्रणालीमुळे पंचायत समितीमधील आणि ग्रामपंचायत मधील कारभार अधिक पारदर्शक होईल आणि सर्वसामान्य नागरिकांची होणारी अडचण थांबेल अशी आशा आहे. अनेकदा ग्रामपंचायतीमध्ये तसेच पंचायत समितीमध्ये सर्वसामान्य नागरिकांची कुचंबना होत असते

नागरिकांची कामे वेळेवर होत नाहीत, त्यांची आर्थिक पिळवणूक सुद्धा होत असते. पण भविष्यात असे कोणतेच प्रकार आपल्याला पाहायला मिळणार नाहीत. नवीन सभासार प्रणाली ग्रामीण स्वराज्य संस्थांचे कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि उत्तरदायी होण्यासाठी मदत करणार आहे. अनेक गावांमध्ये ग्रामसभा होत नाहीत आणि यामुळे त्या गावाचा विकास खंडित होतो. ग्रामसभा झालीच नाही तर निधीचा योग्य वापर शक्य आहे. याचमुळे आता केंद्रातील सरकारने देशभरातील 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये सभासार प्रणाली लागू करण्याची मोठी घोषणा केली आहे.

नव्या प्रणाली बाबत सरकारकडून महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. सरकारने सांगितले आहे की ही प्रणाली एआय द्वारे चालवली जाणारी एक बैठक सारांश प्रणाली राहणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून ग्रामपंचायतींच्या बैठकीचे इतिवृत्त, घेतलेले निर्णय, त्यांचे डेटा विश्लेषण या सर्व गोष्टींच्या नोंदी ठेवल्या जाणार आहेत. या कामात एआय मदत करणार आहे.

या नव्या प्रणालीमुळे बैठकींचे रेकॉर्डिंग, रिपोर्टिंग सहज शक्य होणार आहे आणि यामुळे कामांमधील पारदर्शकता वाढणार आहे. या नव्या प्रणालीमुळे ग्रामविकास निधीचा योग्य वापर झाला का, घेतलेले निर्णय अंमलात आले का, यावरही देखरेख ठेवता येणे शक्य होणार असल्याची माहिती सरकारने दिली आहे. ज्या राज्यांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत त्या राज्यांमध्ये ही प्रणाली लागू करण्यास प्राधान्य राहील. टप्प्याटप्प्याने देशातील सर्वच राज्यांमध्ये ही प्रणाली लागू केली जाणार आहे. पुढील महिन्यापासून ही प्रणाली लागू करण्याचे काम सुरू होणार आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें