अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
राहूरी प्रतिनिधी : शनिशिंगणापूर देवस्थान विश्वस्त मंडळाने मानधन तत्वावर ६ अधिकृत पुजारी नेमले आहेत.तसेच आता शनिदेवाचे अभिषेक पूजन देवस्थानची १०० रुपयाची पावती फाडून होणार असून याची शनिवार दि.
६ सप्टेंबर पासून अंमलबजावणी सुरु करणार असल्याचे शनिशिंगाणापूर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर यांनी सांगितले.
सध्या नोकरभरती प्रकरणी शनिशिंगणापूर देवस्थान मंडळाची मुंबई येथे चौकशी सुरु आहे.तसेच ऑनलाईन पूजा अँप घोटाळा प्रकरणी पण अहिल्यानगर सायबर विभागात चौकशी सुरु असताना शनिशिंगणापूर देवस्थानने अभिषेक व पूजन करण्यासाठी सहा अधिकृत पुजारी यांची मानधन तत्वावर नेमणूक केली आहे.सध्याच्या विश्वस्त मंडळाची मुदत येत्या डिसेंबर २०२५ मध्ये संपत आहे. यामुळे नवीन विश्वस्त मंडळ कोणते येणार याबाबत सध्या परिसरात चर्चा सुरु आहे.