अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा
संगमनेर प्रतिनिधी: सात वर्षांपासून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून गणेश विसर्जनासाठी पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहे.भाविकांची श्रद्धा जपत, अपघात टाळत आणि नदीचे प्रदूषण कमी करत विसर्जन सुरक्षित व शिस्तबद्ध पार पाडणे हा एकविरा फौंडेशन चा संकल्प आहे.
याही वर्षी गंगामाई घाट, जाणता राजा मैदान आणि जोर्वे प्रवरा तीर येथे कृत्रिम तलाव उभारले. निर्माल्य संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. गणेश मूर्तीचे व्यवस्थित विसर्जन व्हावे तसेच फुले, हार यांची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी स्वयंसेवक दिवसभर तिथे उपस्थित होते.
या उपक्रमात जयहिंद आणि आर्या अकॅडमीतील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह एकविरा फाउंडेशनच्या युवतींनी खूप उत्साहाने भाग घेतला होता. सकाळपासून ते उशिरापर्यंत त्यांनी भाविकांना मदत केली, मार्गदर्शन केले आणि विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.
या प्रसंगी मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब , मा. आ. सुधीर तांबे साहेब आणि आ. सत्यजीत तांबे यांनीही उपस्थित राहून एकविरा फाऊंडेशन च्या उपक्रमाला प्रोत्साहन दिलं.
संपूर्ण विसर्जन यशस्वीपणे पार पडल्यानंतर सर्व स्वयंसेवकांनी नृत्य करत जल्लोष केला. या आनंदामागे त्यांचा सातत्याने घेतलेला अथक परिश्रम आणि भाविकांचा सहकार्यभाव आहे.
गेल्या सात वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा आम्ही जपतो आहोत, आणि पुढेही हे काम अधिक उत्साहाने सुरू ठेवण्याचा माझा निर्धार असल्याचे जयश्री थोरात यांनी सांगितले