अहिल्यानगर मराठी न्यूज
पाथर्डी प्रतिनिधी : तालुक्यातील हनुमान टाकळी ग्रामपंचायत हद्दीत वसंत नाईक तांडा सुधार योजनेअंतर्गत सन २०२४-२०२५ मध्ये मंजूर झालेल्या पाडळी रोड ते दगडखैर वस्ती रस्ता खडीकरण कामाबाबत ग्रामस्थांनी आक्षेप नोंदविला असून, हे काम मंजूर ठिकाणी न करता इतरत्र करण्यात आल्याची तक्रार त्यांनी केली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले असून, या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की संबंधित काम ठेकेदारामार्फत सुरू करण्यात आले असले तरी ते मंजूर स्थळाऐवजी इतरत्र करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत ग्रामपंचायत अधिकारी हनुमान टाकळी यांनी २१ जुलै २०२५ रोजी ठेकेदारास मंजूर स्थळीच काम करण्याचे निर्देश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय ग्रामस्थांनी १६जुलै व २८ ऑगस्ट २०२५ रोजी गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी तसेच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग पंचायत समिती पाथर्डी यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या होत्या. तथापि कामावर योग्य ती चौकशी न करता ते सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
निवेदनानुसार ग्रामस्थांचे म्हणणे आहे की सदर कामाचे एम.बी. रेकॉर्डिंग व बिल प्रक्रिया चौकशी न करता सुरू असल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे शासनाच्या मंजुरीनुसार काम होणे अत्यावश्यक आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केले आहे की जर आठ दिवसांच्या आत या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली गेली नाही तर ते १५ सप्टेंबर २०२५ रोजी पंचायत समिती कार्यालय पाथर्डी येथे आमरण उपोषणास बसतील. यावेळी उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीची जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
अर्जदार म्हणून श्री. राजेंद्र भीमराव आव्हाड, शेषराव दगडखैर, रवींद्र दगडखैर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी सही करून अर्ज सादर केला आहे. गावाच्या विकासासाठी मंजूर झालेले काम हे नेमक्या ठिकाणी व्हावे यावर ग्रामस्थांचा भर असून या प्रक्रियेत पारदर्शकता राखणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
सदर निवेदनाची प्रत माहितीस्तव ग्रामविकास विभाग सचिव, समाजकल्याण विभाग सचिव मंत्रालय मुंबई, विभागीय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, प्रांताधिकारी पाथर्डी, तहसीलदार पाथर्डी, पोलीस निरीक्षक पाथर्डी, गटविकास अधिकारी पंचायत समिती पाथर्डी, कार्यकारी अभियंता व उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर तसेच ग्रामसेवक हनुमान टाकळी यांना पाठविण्यात आली आहे.
या प्रकरणावर अंतिम निर्णय व कारवाई प्रशासनाकडून कोणत्या स्तरावर केली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामस्थांनी दाखविलेला ठामपणा आणि प्रशासनाची आगामी भूमिका यावरच पुढील घडामोडी अवलंबून राहणार आहेत.