अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
सोनगाव प्रतिनिधी : धानोरे,सोनगाव, सात्रळ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकारी येत नसल्यामुळे या दवाखान्याला अवकाळा प्राप्त झाली आहे. सध्या लम्पी या आजारामुळे सोनगाव धानोरे व परिसरात थैमान घातले असुन अनेक पशुपालकांच्या गायी व कालवडी उपचाराअभावी मृत पावल्या आहेत पशुवैद्यकीय दवाखाना असून अडचण निर्माण झाली आहे. त्यामुळे पशुपालक शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली असुन शेतकऱ्यांमध्ये पशुदवाखाना व कर्तव्यावर असणारे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्यावर रोष व्यक्त करत आहेत.
धानोरे, सोनगाव, सात्रळ या गावांसाठी एकच पशुवैद्यकीय दवाखाना आहे. परिसरात लम्पी हा आजार बळावला असून पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे गावातील अनेक गायी दगावल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे सहा ते सात महिन्यांपासून उंबरठा झिजवणाऱ्या पशुपालकांना दवाखाना बंद दिसतो व शासनाने हा दवाखाना बंद केला का हेही कळेना किंवा डॉक्टर गैरहजर असल्याचे आहे काय हे ही कळत नाही शेतकऱ्यांसाठी ही धोक्याची आहे.
धानोरे येथील अनेक शेतकऱ्यांच्या गायी दगावल्या आहेत. गावामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नेमलेले असूनही अनेक दिवसांपासून दवाखान्यात ते उपस्थित नाहीत. तसेच दवाखान्यांमध्ये येणारी औषधेही पशुपालकांना मिळत नाहीत. लम्पी आजारावर गावोगावी लसीकरण केले जाते. तरीही धानोरे व परिसरात आजपर्यंत शंभर टक्के लसीकरण झालेले नाही, तसेच जेवढे लसीकरण झाले आहे ते लसीकरण खाजगी डॉक्टर कडून करून घेतलेले आहे असा आरोप येथील पशुपालकांनी केला आहे.
काही पशुपालकांनी संबंधित डॉक्टरांना फोन केले असता मी कोल्हारला राहतो, तुम्ही खासगी डॉक्टरांशी संपर्क करा, असे उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले. येथे नेमणूक असलेल्या डॉक्टरांचा अशा बेजबाबदार वर्तनामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. पशुवैद्यकीय सेवा ही शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असून आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टरांची उपस्थिती महत्त्वाची असते. अशा कामचुकार डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या गायी दगावल्या त्यांना प्रशासनातर्फे मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी त्वरित कर्तव्यावर हजर न झाल्यास व वेळेवर उपचार न मिळाल्यास जनावरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. मृत जनावरे पशु वैद्यकीय दवाखान्यात आणून टाकले जातील असे याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. व मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा पशुपालक व गावकऱ्यांनी दिला आहे.