September 19, 2025 8:36 am

धक्कादायक प्रकार चक्क डांबरी रस्त्यावर मुरुमाचे अंथरुण

अहिल्यानगर मराठी न्यूज वृत्तसेवा

झगडेफाटा पोहेगाव रांजणगाव रस्त्यावर अजब प्रकार नागरिकांनी रोखला

कोपरगाव प्रतिनिधी ( प्रशांत टेके ) : कोपरगाव तालुक्यातील झगडे फाटा ते रांजणगाव या महत्वाच्या रस्त्यावरील निकृष्ट कामामुळे नागरिकांच्या रोषाला तोंड फुटले आहे. दहा कोटी रुपयांचा निधी खर्च करून या रस्त्याचे दर्जेदार काम होणे अपेक्षित होते मात्र ते झाले नाही. आता पुन्हा नागरिकांनी रोष व्यक्त केल्यावर प्रत्यक्षात मुरूम टाकून खड्डे बुजवण्याचा केविलवाणा प्रकार करण्यात आला. रस्ता खड्डेमय असून नागरिकांच्या जीवाशी खेळणारा हा प्रकार ठरत आहे. भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या विळख्यात अडकलेला हा मार्ग औट घटका मोजत आहे.

या कामात पारदर्शकतेचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसत असून, निधीचा चुराडा करून ठेकेदार व सत्ताधारी यांनी सावळा गोंधळ केल्याचे बोलले जात आहे. कोपरगाव तालुक्यात झालेली ही दुरावस्था आणि निष्काळजीपणावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही कोणतीही दखल न घेतल्याने त्यांचा संताप शिगेला गेला आहे.

दररोज या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी, शेतकरी व सामान्य प्रवासी नागरिक प्रवास करतात. खड्ड्यांमुळे अनेकांना अपघातांचा धोका निर्माण झाला असून, जीवितहानीची शक्यता वाढली आहे. जबाबदार प्रतिनिधींनी जनतेच्या सुरक्षेला प्राधान्य न देता केवळ कागदी कामे करून निधीचा गैरवापर केला, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.

झगडे फाटा–रांजणगाव रस्ता हा तालुक्याला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे याठिकाणी केलेल्या निकृष्ट कामामुळे केवळ कोपरगाव तालुका नव्हे तर संपूर्ण परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांकडून या कामाचा सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

निकृष्ट दर्जाचे काम, ठेकेदारांची बेफिकिरी मुळे जनता संतप्त झाली आहे. तालुक्यातील जनतेशी खेळणारे असे प्रकार त्वरित थांबवून जबाबदारांकडून उत्तरदायित्वाची जाणीव करून द्यावी, हीच नागरिकांची एकमुखी मागणी आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें