अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
लोणी प्रतिनिधी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थीना मिळावा यासाठी महामंडळाच्या योजनांची व्यापक प्रसिद्धी करण्यात यावी. महामंडळाच्या योजनांच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय वाढण्याबरोबरच या योजनांच्या माध्यमातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत यासाठी अधिकाधिक प्रयत्न करावेत, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा मंत्रिमंडळ उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मार्फत आता पर्यंत १ लाख ५५ हजार पेक्षा जास्त लाभार्थ्यांना विविध बँका मार्फत १३ हजार २५४ कोटीचा कर्ज मंजूर करण्यात आले असून महामंडळा मार्फत १ हजार ३११ कोटीचा व्याज परतावा करण्यात आला आहे. यावेळी महामंडळाच्या योजनांचा आढावा जलसंपदा मंत्री श्री. विखे-पाटील यांनी घेतला. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्री विजयसिंह देशमुख, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव सुदाम आंधळे आदी उपस्थित होते.