हणमंतगाव प्रतिनिधी (संदीप गावडे) राहाता तालुक्यातील हणमंतगाव मधून जेजुरकर -गावडे-घोलप वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दैयनीय अवस्था झाली आहे. रस्ता असून अडचण आणि नसून खोळंबा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हणमंतगाव हे मध्यम लोकवस्तीचे गाव असून बऱ्यापैकी कुटुंब वाड्या- वस्त्यावर राहतात. नदीच्या बाजूकडील जेजुरकर वस्ती, गावडे वस्ती व घोलप वस्ती येथील बहुसंख्य नागरिक या रस्त्याने प्रवास करत असतात. हा रस्ता अतिशय अरुंद व वळणाचा असून जलजीवन मिशनच्या पाईपलाईन करिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आलेले आहे. पावसामुळे सर्व रस्ता चिखलमय झालेला असून परिसरातील ग्रामस्थ, विद्यार्थी व कामगार यांना चिखल व खड्ड्यातून वाट काढत कसरत करत जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्यावर दोन्ही बाजूने अतिक्रमण झालेले असून स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी करून सदर रस्ता दुरुस्त झालेला नाही. यापूर्वीही सदर रस्ता शासना मार्फत खडीकरण करून दिला होता परंतु रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठते. पाणी वाहून न गेल्यामुळे सर्व रस्ता चिखलमय व खड्डेमय झालेला आहे. तरी स्थानिक प्रतिनिधीनी तात्काळ या कामात लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता डांबरीकरण किंवा कांक्रीटीकरण करून द्यावा अशी सर्व ग्रामस्थांची मागणी आहे.