अहिल्यानगर :प्रतिनिधी शहाजी दिघे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (ता.१) अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारचं पहिलं प्राधान्य देशातील शेतीला आहे, अशी ग्वाही देत अर्थमंत्री सीतारामन यांनी विविध घोषणा केल्या.
कडधान्य, कापूस, भाजीपाला आणि भरडधान्य उत्पादकता वाढवण्याबद्दल, किसान क्रेडिट कार्ड, युरिया खत निर्मिती कारखाने, मखाना बोर्डची स्थापन घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी (ता.१) केल्या आहेत.
पीएम कृषी धनधान्य योजना
पंतप्रधान धनधान्य योजना देशातील मागास १०० जिल्ह्यात राबवून १.७ कोटी शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल. यामध्ये उत्पादकता वाढवणे, विविध पिकांची लागवड, शाश्वत शेतीपद्धती, तालुका पातळीवर काढणी पश्चात सुविधा, सिंचन सुविधेत वाढ, दीर्घ व अल्प मुदतीचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
किसान क्रेडिट कार्ड
शेतकऱ्यांना देण्यात येणारं कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी किसान क्रेडिट कार्डची सवलत व्याज मर्यादा ३ लाखांवरून ५ लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. किसान क्रेडिट कार्डमुळे ७.७ कोटी पशू व मत्स्यपालक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
बिहारमध्ये मखाना बोर्ड
बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्यात येणार आहे. मखानाचा मूल्यवर्धन करण्यासाठी केंद्र सरकारने घोषणा केली आहे. त्यासाठी १०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अन्न प्रक्रिया उद्योगातही बिहार झुकतं माप देण्यात आलं आहे.
कडधान्यात आत्मनिर्भर
देशाला कडधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात १ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यासाठी पुढील ६ वर्षे कडधान्य मिशन राबवली जाणार असून प्रामुख्याने तूर, उडीद आणि मसूरची शेतकऱ्यांकडून पुढील ४ वर्ष खरेदी करण्यात येईल, अशी घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
कापूस उत्पादकांसाठी
देशातील कापूस उत्पादक सध्या कमी उत्पादकता आणि कमी भाव यामुळे अडचणीत आले आहेत. देशातील कापूस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने ५ वर्षांसाठी कापूस उत्पादकता मिशनची (मिशन फाॅर काॅटन प्रोडक्टीव्हीटी) घोषणा केली आहे. यातून शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी अद्यावत तंत्रज्ञान पुरवले जाणार आहे. तसेच अतिरिक्त लांब धागाचे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली.
युरिया खत कारखाना
आसाममधील नामरूप येथे तीन युरिया खत निर्मितीचे कारखाने उभारण्यात येणार आहेत. या कारखान्यांची एकूण युरिया निर्मितीची क्षमता १२.७ लाख असणार आहे.