पारनेर :गणेश वाघ
पारनेर : तालुक्यातील पळसपूर येथे स्थित आदर्श विद्यालयाच्या दहावी वर्गाच्या २०००-२००१बॅचचे माजी विद्यार्थी २४ वर्षांनंतर एकत्र आले. यशोधन ॲग्रो टुरिझम, नारायणगाव येथे आयोजित केलेल्या गेट टुगेदर कार्यक्रमात विद्यार्थी वय, पद, प्रतिष्ठा आणि कामाचा व्याप बाजूला ठेवून उत्साहाने सहभागी झाले.
कार्यक्रमाचे आयोजन कानिफनाथ आहेर आणि राजेंद्र आहेर यांनी केले होते. ज्योतीताई झावरे, जाधव मॅडम यांनी हृदयस्पर्शी शब्दांत कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली, तर श्री संभाजी भाईक सर आणि श्री संदीप पुरी सर यांनी संपूर्ण गेट-टुगेदरचे प्रभावी निवेदन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. रेश्माराणी पठारे,आवळे मॅडम यांनी “देवा श्री गणेशा” या गीतावर सुंदर नृत्य सादर करून वातावरण भारावून टाकले. माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देताना मनोगत व्यक्त केले.
स्मरणीय क्षणांचे जतन करण्यासाठी सर्व क्षण कॅमेऱ्यात कैद करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांना आकर्षक सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे कार्यक्रमाला एक खास गोडवा प्राप्त झाला. यशोधन ॲग्रो टुरिझमच्या निसर्गरम्य वातावरण, उत्तम भोजन व्यवस्था, सुशोभित गार्डन आणि अद्वितीय आतिथ्यामुळे कार्यक्रम आणखी संस्मरणीय ठरला.
दत्तात्रय हरीभाऊ भाईक यांनी या दिवसाची भावना व्यक्त करताना सांगितले की जुन्या मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठी, हसण्याखेळण्यात हरवलेले क्षण, आणि आठवणींनी भरलेला हा दिवस सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहतील.
