अहिल्यानगर – शहाजी दिघे श्री क्षेत्र प्रयाग राज येथे भव्य दिव्य स्वरूपात सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात लाखो तपस्वी साधुसंतांच्या उपस्थितीत महंत अवधेशानंदगिरी महाराजांच्या हस्ते महान शिवयोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांना “जगद्गुरु” ही उपाधी सन्मानपूर्वक बहाल करण्यात आली. जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांनी भोळ्या भाबड्या भाविकांसाठी सुरू केलेला भक्तीमार्ग उत्तराधिकारी महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज अतिशय जबाबदारीने व सुयोग्य पद्धतीने पुढे घेऊन जात आहे. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील जय बाबाजी भक्त परिवार नेहमीच उत्स्फूर्तपणे साथ देत असतो. महात्मा शांतीगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभर भव्य दिव्य जपानुष्ठाण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या संत जनार्दन स्वामी आश्रमात ठरलेल्या पारंपारिक तिथीनुसार नियमितपणे सुरू असतात. शांतीगिरी महाराज वेरूळ येथे गोशाळा तसेच शाळा , महाविद्यालय गोरगरीबांच्या मुलांसाठी गुरूकुल अतिशय उत्कृष्टपणे चालवत आहेत.अनेक ठिकाणी नवीन आश्रमाची स्थापना केलेली आहे.तसेच बर्याच आश्रमात शाळा सुरू केलेल्या आहेत.असंख्य व्यसनाधीन युवकांना महात्माजींनी व्यसनमुक्त करून सनातन धर्माचे पालन करायला शिकुन जय बाबाजी परीवाराचा सदस्य केलेले आहे. त्यामुळे जय बाबाजी भक्त परिवारात सहभागी झालेले लाखो लोक भक्तीरसात मुक्तपणे संचार करुन संपूर्ण कुटुंबा बरोबर आनंदाने जिवन व्यथित करीत आहेत. महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराजांच्या या लोकोपयोगी उपक्रमांची व कार्याची दखल घेऊन जुन्या पंचम दशनाम आखाड्याचे प्रमुख अवधेशानंदगिरी महाराजांच्या हस्ते पट्टा अभिषेक करून जगद्गुरु ही उपाधी बहाल करण्यात आली. महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने असलेल्या जय बाबाजी भक्त परिवाराकडून जगद्गुरु पदवी मिळाल्यानंतर महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरीजी महाराजांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
