अहिल्यानगर :प्रतिनिधी
अहिल्यानगर : यंदा फेब्रुवारी महिन्यात उष्णता वाढलेली असल्यामुळे उन्हाचे चटके बसू लागले असून, संगमनेर तालुक्यातील सायंखिंडी गावाकडून पाण्याच्या टँकरची मागणी केली असल्याने प्रसासनानेही जिल्ह्यातील संभाव्य टंचाईग्रस्त गावांतील जनतेला पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी टॅकर पुरवठा करणार्या संस्थांकडून ऑनलाईन निविदा मागवल्या आहेत.
दरवर्षी पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. पावसाची नोंद अधिक असली तरीही दरवर्षी मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांत संगमनेर, नगर, श्रीगोंदा, पाथर्डी आदी तालुक्यांत उन्हाच्या तडाख्यामुळे विहिरीची पाणीपातळी खालावून काही गावांत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ३० जूनपर्यंत जिल्ह्यातील ६४५ गावे आणि २ हजार ४१५ वाड्यांत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरुन ४१ कोटी ६९ लाख ७४ हजार रुपयांचा टंचाई कृती आराखडा मंजूर केला आहे. यामध्ये पारनेर व पाथर्डी या दोन शहरासाठी देखील टंचाई आराखड्यात ९५ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
फेब्रुवारी महिन्यात उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. दिवसेंदिवस ही परिस्थिती अधिकच तीव्र होऊन पाणीटंचाई निर्माण होऊन टँकरची मागणी केली जात आहे. संगमनेर तालुक्यातील सायखिंडी या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून, या गावाचा टँकर मागणीचा प्रस्ताव संगमनेर प्रांताधिकारी कार्यालयात दाखल झाला आहे. त्यामुळे या गावातील पाणी परिस्थितीचे सर्वेक्षण करुन या ठिकाणी लवकरच टँकर धावताना दिसणार आहे.
जिल्ह्यातील ६४५ गावे आणि २ हजार ४१५ वाड्यांत संभाव्य पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता ग्रहीत धरुन जिल्हाधिकारी यांनी टँकर पुरवठादार संस्थांकडून ऑनलाईन निविदा मागविल्या आहेत. १८ फेब्रुवारीपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत असून, २० फेब्रुवारीला दुपारी २ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात निविदा उघडल्या जाणार आहेत.
३० जून २०२५ पर्यंत टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी टंचाई आराखड्यात ३३ कोटी १७ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद केली आहे. पारनेर व जामखेड या दोन शहरात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यासाठी ९५ लाख रुपयांची तरतूद देखील जिल्हाधिकारी यांनी केली आहे.