September 11, 2025 8:38 am

अहिल्यानगरमध्ये ‘कांदा क्लस्टर’ला मंजुरी मिळाली ! शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ?

अहिल्यानगर :प्रतिनिधी 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कांदा उत्पादन क्षेत्रात मोठी वाढ झाली असून, आता उद्योग विभागाने ८. ६१ कोटी रुपये खर्चाच्या ‘कांदा क्लस्टर’ ला मंजुरी दिली आहे. यामुळे १५० जणांना थेट तर ८०० जणांना अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याची शक्यता आहे.

कांदा क्लस्टर कशामुळे महत्त्वाचे ?

जिल्ह्यातील कांद्याखालील क्षेत्र २. २५ लाख हेक्टरवर पोहोचले असून यंदा ५१५४१ हेक्टरची विक्रमी वाढ झाली आहे. त्यामुळे बागायती शेतकरी मोठ्या प्रमाणात कांद्याच्या लागवडीकडे वळले आहेत.श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या ‘कांदा क्लस्टर’ प्रकल्पामुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे योग्य दर, प्रक्रिया उद्योग आणि निर्यात यासंबंधी मोठ्या संधी निर्माण होतील.

उद्योग विभाग आणि राज्य सरकारचा पुढाकार

‘महालक्ष्मी ग्रामलाईफ असोसिएशन’ या शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या कंपनीमार्फत हा प्रकल्प राबवला जात आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या पुढाकारातून उद्योग विभागाने या क्लस्टरला मंजुरी दिली आहे.

कांदा प्रक्रियेसाठी नवीन तंत्रज्ञान

उद्योग विभागाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत १५० शेतकऱ्यांना सौरउर्जेवर आधारित ‘ओनियन ड्रायर’ मंजूर करण्यात आले आहेत. याच तंत्रज्ञानाच्या आधारे कांदा वाळवून त्याची भुकटी, केक्स आणि बरिस्ता उत्पादन करण्याच्या उद्योगाला चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना कसा होणार फायदा ?

✔ राज्य सरकार ८०% भांडवल उभारणार, उर्वरित २०% भांडवल कंपनी उभारणार.

✔ ग्रेडिंग, सॉर्टिंग, सामूहिक ड्रायर आणि पावडर निर्मितीसाठी यंत्रसामग्री उपलब्ध होणार.

✔ शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ आणि निर्यात संधी मिळणार.

✔ ग्रामीण भागातील महिलांना आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार.

क्लस्टरमुळे रोजगार आणि उद्योग वाढणार

जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अतुल दवंगे यांनी सांगितले की, अन्नप्रक्रिया उद्योग वाढीसाठी जिल्ह्यात विविध क्लस्टर उभारले जात आहेत. याआधी अहिल्यानगरमध्ये ऑटो इंजिनिअरिंग, कोपरगाव व संगमनेरमध्ये गारमेंट, प्रिंटिंग आणि सुवर्ण कारागिरीसारखी 5 क्लस्टर यशस्वी झाली आहेत. याशिवाय, संगमनेरमध्ये ११ कोटींचा अल्युमिनियम क्लस्टर, अळकुटी येथे २६. ११ कोटींचा स्टील क्लस्टर, ८. ६१ कोटींचा कांदा क्लस्टर, हे उद्योग विभागाने मंजूर केले आहेत, त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी : या प्रकल्पामुळे कांद्याच्या उत्पादनावर प्रक्रिया करून निर्यात शक्य होणार आहे. तसेच स्थानिक बाजारपेठेत उच्च प्रतीचे कांदा उत्पादने विक्रीला येतील, त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें