अहिल्यानगर शिक्षण व शेतीविषयक
महाराष्ट्र राज्यातील कृषी पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाच्या कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत नवीन शैक्षणीक धोरणाशी सन २०२० नुसार सुसंगत करुन उच्च शिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.
त्यामुळे या विद्यार्थ्यांना स्वयं रोजगारातून अनेक लघुउद्योग उभारता येतील असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे कृषी तंत्रज्ञान शिक्षण विभागाचे सहयोगी अधिष्ठाता राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष डॉ. प्रशांत बोडके यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय सहयोगी अधिष्ठाता (कृषी तंत्रज्ञान शिक्षण) समन्वय समितीची दोनदिवसीय बैठक झाली. अध्यक्षस्थानी डॉ. प्रशांत बोडके होते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. नितीन दानवले होते.
कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. रवींद्र बनसोड, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. जी.के. लोंढे, दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. टी. ठोकळ, अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर. एन. काटकर व बारामती येथील कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य डॉ. रासकर उपस्थित होते.
डॉ. प्रशांत बोडके म्हणाले, की आपल्या कृषी पदविकेच्या शिक्षणाला कौशल्य आधारित शेतीपूरक व्यावसायिक अभ्यासक्रमाची जोड द्यायला हवी. यामुळे या विद्यार्थ्यांना नोकरी तसेच स्वतःचा उद्योग निर्माण करण्याच्या अनेक संधी निर्माण होतील.
कृषी पदविकेच्या अभ्यासक्रमामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोट तंत्रज्ञान तसेच ड्रोन तंत्रज्ञान या विषयीचा अंतर्भाव होणे गरजेचे असून यामुळे या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी निर्माण होतील.
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठात सुरू असलेले माळी प्रशिक्षण, कृषी तंत्र पदविका व कृषी तंत्र निकेतन अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने भारत सरकारच्या नविन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १० उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाच्या व स्वयंरोजगाराच्या नवनवीन कौशल्य विकास आभ्यासक्रमासह नावीन्यपूर्ण संधी उपलब्ध होण्यासाठी सदरच्या तीनही अभ्यासक्रमात बदल करण्यासाठी दोनदिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.