September 11, 2025 8:33 am

जोर्वे ग्रामसभेत अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर वादळी चर्चा, ग्रामस्थांनी जोर्वेतच कार्यालयाची मागणी केली

संगमनेर :प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीच्या विशेष ग्रामसभेत अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थळी वादंग निर्माण झाला. आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाला जोर्वे ग्रामस्थांनी कडाडून विरोध करत, हे कार्यालय जोर्वेतच व्हावे अशी ठाम मागणी केली.
ग्रामसभेत काही सदस्यांनी अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेस विरोध करत ठराव मांडला, मात्र बहुतांश ग्रामस्थांनी याला विरोध दर्शवत अप्पर तहसील कार्यालय झाल्याशिवाय राहणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे ग्रामसभा वादळी ठरली.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, तालुक्यात १७४ गावे असूनही फक्त एकच तहसील कार्यालय असल्याने महसूल यंत्रणेवर ताण आहे. त्यामुळे नागरिकांची महत्त्वाची कागदपत्रे, शिधापत्रिका, शेती वाद, उत्पन्न दाखले, विविध सरकारी योजनांचे लाभ यांसारखी कामे रखडत आहेत. ग्रामसभेत चर्चेच्या वेळी उपस्थित ग्रामस्थांनी जोरदार भूमिका घेत, आश्वी येथे कार्यालय करण्याऐवजी जोर्वे हेच मध्यवर्ती ठिकाण आहे. त्यामुळे नवीन अप्पर तहसील कार्यालय जोर्वेतच व्हावे, अशी मागणी केली.
ग्रामसभेत माजी आमदारांवर टीका
ग्रामसभेच्या चर्चेदरम्यान, मतदारसंघाच्या फेररचनेवेळी जोर्वे गावाचा समावेश शिर्डी मतदारसंघात करण्यात आला. त्या वेळी तालुक्याच्या माजी आमदारांनी याला विरोध का केला नाही? आणि आता मात्र जोर्वे गावाच्या मुद्द्यावर का बोलत आहेत? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. ग्रामसभा गाजवणाऱ्या गोकुळ दिघे यांनी संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले, सामान्य नागरिकांच्या महसूल संबंधित कामांसाठी अप्पर तहसील कार्यालय आवश्यक आहे. शेती, शिवार रस्ते, शिधापत्रिका, न्यायालयीन प्रकरणे, निराधार योजना अशा अनेक कामांसाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. हे काही लोकांना खपत नाही का?
अप्पर तहसील कार्यालयास ग्रामस्थांचा पाठिंबा, पालकमंत्र्यांकडे मागणी
ग्रामसभेच्या अखेरीस आवाजी मतदान घेण्यात आले. त्यात ग्रामस्थांनी एकमुखाने अप्पर तहसील कार्यालयाच्या स्थापनेसाठी ठराव मंजूर केला. आश्वी, उंबरी बाळापूर, पानोडी, ओझर, झरेकठी, शेडगाव, शिबलापूर, कनकापूर, चिंचपुर या गावांसाठीही जोर्वे हे अधिक सोयीचे ठिकाण असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आम्ही लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदन देणार आहोत, असे गोकुळ दिघे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आगामी काळात या विषयावर प्रशासन काय भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें