प्रशांत टेके पाटील कार्यकारी संपादक.
कोपरगाव – कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, धोत्रे, तळेगाव मळे या गावांतील विहिरी आटल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत मा.आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी तातडीने पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून गोदावरी डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील कोळ नदीवरील घोयेगाव-गोधेगाव साठवण बंधारा भरून घेण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे संबंधित साठवण बंधाऱ्यात गोदावरी डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले.
या उपक्रमामुळे आपेगाव, गोधेगाव, घोयेगाव, धोत्रे, तळेगाव मळे या गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांना चालना मिळाली असून, पिण्याच्या पाण्याचा बिकट प्रश्न सुटला आहे. सध्याच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्यासाठी होणारी धावपळ थांबली असून ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कार्याबद्दल संबंधित गावांच्या ग्रामपंचायती व नागरिकांनी मा. आ. स्नेहलताताई कोल्हे यांचे मनःपूर्वक आभार मानले असून, त्यांच्या तत्पर व लोकहितवादी कार्याचे कौतुक केले आहे.