September 21, 2025 9:52 am

आरोग्याच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी,आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती द्या-डॉ. ओमप्रकाश शेटे

शहाजी दिघे

अहिल्यानगर – सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रबिंदू मानून सामान्यांना आरोग्याच्या सेवा मोफत व अधिक दर्जेदार मिळाव्यात यासाठी शासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाच लक्ष रुपयांपर्यंतचे उपचार मोफत स्वरुपात देण्यात येत असल्याने गोल्डन कार्ड नोंदणी प्रक्रियेला अधिक गती देत आरोग्याच्या सेवा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याचे निर्देश आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ.ओमप्रकाश शेटे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. शेटे यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण,अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी नंदकुमार नेहरकर, आयुष्यमान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख आदींची प्रमुख उपस्थिती.

केंद्र शासनाची जनआरोग्य योजना व राज्य शासनाची महात्मा जोतीबा फुले जनआरोग्य योजना या दोनही योजनांचे एकत्रीकरण करुन आयुष्मान भारत योजना राबविण्यात येत असल्याचे सांगत डॉ. शेटे म्हणाले की, जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी आरोग्य उपचारापासून वंचित राहणार नाही यासाठी आरोग्य यंत्रणेसोबत इतर संबंधित शासकीय यंत्रणांनी गोल्डन कार्ड नोंदणी व प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वितरण प्रक्रिया गतिमान पद्धतीने राबवावी. या योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांच्या होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. गतवर्षात जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेंतर्गत १७७ कोटी रुपये खर्च करत ७५ हजार रुग्णांना आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला असल्याचेही ते म्हणाले.

गतकाळात राज्यात ९०० रुग्णालये अंगिकृत होते. विद्यमान शासनाच्या काळामध्ये २ हजार ३१ रुग्णालये अंगिकृत करण्यात आले आहेत. राज्यातील पात्र असलेल्या ४ हजार १८० रुग्णालयांची यादी तयार करण्यात आली असून येत्या सहा महिन्यात ही रुग्णालये या योजनेसाठी पात्र करण्यात येणार आहेत. योजनेबाबत नागरिकांच्या असलेल्या तक्रारींच्या निरसनासाठी जिल्हास्तर समिती अथवा १८००२३३२२०० या क्रमांकावर तक्रार दाखल करण्याचे आवाहनही डॉ. शेटे यांनी यावेळी केले.

*हिवरेबाजार गावात १०० टक्के गोल्डनकार्ड नोंदणी*

हिवरेबाजार या गावातील नागरिकांची १०० टक्के गोल्डनकार्डची नोंदणी करण्यात आली असून हिवरेबाजार राज्यातील पहिले १०० टक्के नोंदणी झालेले गाव ठरले आहे. गावाच्यावतीने या ठिकाणी स्वयंसेवक देण्यात येत असून त्यांना स्वतंत्र लॉगीन आयडी देण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना रुग्णालयातून आरोग्याच्या मोफत सेवा देण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातील ज्या गावांमधून अशा प्रकारचे प्रस्ताव येतील त्यांना मोफत उपचार करणाऱ्या रुग्णालयांची यादी देण्याबरोबरच स्वतंत्र लॉगीन आयडी देण्यात येणार असल्याचेही डॉ. शेटे म्हणाले.

प्रारंभी आयुष्मान भारत योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉ. वसीम शेख यांनी या योजनेअंतर्गत जिल्ह्यात केलेल्या कामाची माहिती सादर केली. जिल्ह्यात आयुष्मान भारत योजनेंतर्गत ८९ रुग्णालये योजनेशी संलग्न करण्यात आले असून आतापर्यंत १७ लाख ८० हजार लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरित करण्यात आले आहेत. उर्वरित कार्डधारकांची नोंदणी करुन कार्ड वितरणाची कार्यवाही सुरु असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

बैठकीस आरोग्य विभागाचे अधिकारी व जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

अधिक वाचा

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें

धानोरे घाट देवस्थान च्या वैभवात भर नवरात्र उत्सवानिमित्त कृष्ण व गायवासरू मूर्ती व देवस्थानाचे नावाचा डिजिटल एल ई डी व कारंज्या असलेला सेट देवस्थानास भेट,घटस्थापनेच्या दिवशी लोकार्पण सोहळा