अहिल्यानगर मराठी न्यूज
कोपरगाव : ग्रामीण महाराष्ट्रातील वंचित महिलांसाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा पुरविण्याच्या उद्देशाने, हिंदुजा फाउंडेशन ने अहमदनगर स्थित प्रतिष्ठित स्वयंसेवी संस्था डॉ.माने मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर हिच्याशी सामंजस्य करार केला आहे. या भागीदारीतून शिर्डीमध्ये आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये संपूर्णपणे मोफत कर्करोग तपासणी व जनजागृती उपक्रम सुरू करण्यात आला आहे.डिसेंबर २०२५पर्यंत १०,००० अत्यंत गरीब महिलांची गर्भाशय मुख (सर्व्हायकल) व स्तन कर्करोगासाठी तपासणी करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.या मोहिमेअंतर्गत पहिले तपासणी शिबीर ८ जून रोजी शिर्डीपासून ६० किमी अंतरावरील राहुरी येथे पार पडले. तेथे सुमारे ३५० महिलांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाचे लवकर निदान व वेळेवर उपचार हे उद्दिष्ट या उपक्रमाच्या केंद्रस्थानी आहे. वंचित समुदायांना आर्थिक अडचणी व भौगोलिक मर्यादांमुळे अशा तपासण्या करून घेता येत नाहीत. त्यांच्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपलब्ध करून ही तफावत भरून काढण्याचा हा प्रयत्न आहे.या उपक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणी जबाबदारी डॉ. माने मेडिकल फाउंडेशन यांच्याकडे असून, त्यांना स्थानिक जनजागृती उपक्रमांचे पाठबळ देण्यात येत आहे. सर्व महिलांची ‘पॅप स्मीअर’ तपासणी व ‘क्लिनिकल ब्रेस्ट एग्झॅमिनेशन’ केली जाईल. गरज असल्यास, हिमोग्लोबिन, रक्तातील साखर व कोलेस्टेरॉल यांच्या चाचण्याही करण्यात येणार आहेत.या उपक्रमाबद्दल बोलताना ‘हिंदुजा फाउंडेशन’च्या सूकाणू समितीच्या सदस्या नम्रता हिंदुजा म्हणाल्या, “महिलांना आरोग्याच्या माध्यमातून सशक्त करणे हे बळकट समाजनिर्मितीचे मूलभूत पाऊल आहे. आरोग्यसेवेत असलेली तफावत भरून काढणे आणि कोणतीही स्त्री केवळ तिच्या आर्थिक परिस्थितीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न करणे, ही आमची ठाम बांधिलकी आहे.”शिबिरामध्ये ज्या महिलांमध्ये संशयास्पद लक्षणे आढळतील, त्यांना राहुरी येथील ‘डॉ. माने चॅरिटेबल कॅन्सर हॉस्पिटल’मध्ये मोफत उपचार दिले जातील. याचबरोबर, स्थानिक आरोग्यसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून आरोग्यव्यवस्थेची क्षमता वाढवण्यावरही भर दिला जात आहे.