अहिल्यानगर मराठी न्युज : शहाजी दिघे
अहिल्यानगर : दहावीचा निकाल लागून जवळपास १ महिना उलटत आला आहे. मात्र, अद्याप अकरावी प्रवेशाचा गोंधळ काय मिटायचे नाव घेत नाही. अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल होण्याची पहिली, दुसरी नाही तर तिसरी वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चांगलेच गोंधळून गेल्याचे पाहायला मिळत आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार अकरावी प्रवेशाच्या जवळपास ८ लाख जागा खाली राहणार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक महाविद्यालयांना प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अॅडमिशन मिळाल्यास टाळे ठोकण्याची नामुष्की तर ओढवणार नाही अशी भीती निर्माण झाली आहे. तसेच अनेक शिक्षकांच्या नोकरीवर देखील गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणी वाढवण्याच्या दृष्टीने अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात बदल केला जात असल्याची चर्चा रंगत आहे.
दहावीचा निकाल लागून जवळपास १ महिना उलटत आला आहे. मात्र, अद्याप अकरावी प्रवेशाचा गोंधळ काय मिटायचे नाव घेत नाही. अकरावी प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल होण्याची पहिली, दुसरी नाही तर तिसरी वेळ आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक चांगलेच गोंधळून गेल्याचे पाहायला मिळत आहेत. वेळापत्रकात बदल करण्यामागे संस्थाचालकांची खेळी असल्याचा सूर दबक्या आवाजात उमटत आहे. महाविद्यालयांची प्रवेश क्षणता पूर्ण होत नसल्याने वेळापत्रकात बदल तर करण्यात येत नाही ना ? अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.
अकरावी प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार ४३५ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २१ लाख २३ हजार ४० जागा उपलब्ध आहेत. मात्र, प्रवेशासाठी १२ लाख ७१ हजार २९५ विद्यार्थ्यांनीच अर्ज केले आहेत. त्यामुळे तब्बल ८ लाख ५१ हजार जागा रिक्त राहणार असल्याने अनुदानित खासगी शाळांमधील अंदाजित दहा हजारांहून अधिक शिक्षक पटसंख्येअभावी अतिरिक्त होतील, अशी भीती वर्तवण्यात येत आहे. तसेच अनेक महाविद्यालयांना आवश्यक तेवढे प्रवेश न मिळाल्यास त्यांची मान्यता धोक्यात येण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे संस्था निहाय कोट्याअंतर्गत प्रवेश मिळवण्याची मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.
राज्यात अकरावी प्रवेशासाठी कला शाखेच्या सहा लाख ७२ हजार, वाणिज्य शाखेच्या साडेपाच लाख तर विज्ञान शाखेच्या आठ लाख ७० हजार जागा उपलब्ध आहेत. राज्यातील ५२७ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये तर प्रवेश क्षमतेपेक्षा निम्मे देखील अर्ज आलेले नाहीत. त्यामुळे खासगी संस्थाचालक ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया बंद करण्याची दबक्या आवाजात मागणी करत असल्याची स्थिती आहे.
अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी (कॅप राउंड) १० जूनला प्रसिद्ध होणार होती, मात्र आता सुधारित वेळापत्रकानुसार २६ जूनला जाहीर होणार आहे. १७ जून रोजी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या शाळा आणि प्रवेशाचे परिक्षण होणार आहे. पहिल्या यादीनंतर २७ जून ते ३ जुलै या कालावधीत विद्यार्थ्यांना कॅप राउंड अंतर्गत प्रवेश घ्यायचा आहे. दुसऱ्या फेरीसाठी ५ जुलै रोजी रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.