अहिल्यानगर मराठी न्युज
कोपरगाव : तालुक्यातील वारी येथील सोमैया विद्या मंदिर व उच्च माध्यमिक विद्यालय येथे १९९४ च्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात व भावनिक वातावरणात संपन्न झाला. तब्बल ३१ वर्षांनंतर आयोजित झालेल्या या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत पुन्हा एकदा शालेय जीवन अनुभवले आणि भावी वाटचालीसाठी प्रचंड ऊर्जा मिळाल्याची अनुभुती मिळवली.
माजी विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाब पुष्प देऊन व पारंपरिक फेटे परिधान करून करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व कै. करमशीभाई सोमैया यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका सौ. सुनिता पारे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक रतिलाल क्षेत्रे उपस्थित होते. विद्यालयाचे शिक्षक शेख, खटावकर, कडू, मोरे, मिश्रा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मनमोकळ्या गप्पा आणि जुन्या आठवणी
माजी मुख्याध्यापक रतिलाल क्षेत्रे यांनी आपल्या भाषणात शाळेत कार्यरत असताना स्मरणात असलेल्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षीय भाषणात सौ. पारे यांनी माजी विद्यार्थ्यांचे शाळेप्रती असलेले प्रेम व स्नेह याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली व माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रगतीसाठी पुढील काळात सक्रिय राहावे असे आवाहन केले.
माजी विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग
या स्नेहमेळाव्यात नितीन दुसाने, विरेंद्र बागुल, दादासाहेब साळुंके, चंद्रकांत मोरे, अतुल आंबेकर, धर्मेश पाटील, महेश देशमुख, सुनील मगर, संतोष अहिरे, अनिल सुरडकर, रमेश साळवे, अजय भडांगे, मनिषा देवरे, कल्पना सोनवणे, रोहिणी बाविस्कर, पुष्पा सोनार आदी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला चहा नाश्त्याची सोय करण्यात आली होती. कार्यक्रमाची सांगता सुरुची भोजनाने करण्यात आली होती.
संकल्पना – “प्रेरणादायी वृक्षारोपणाची”
३१ वर्षांनंतरच्या अविस्मरणीय भेटीची आठवण म्हणून माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात पिंपळाचे झाड लावून ‘प्रेरणादायी वृक्षारोपण’ केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र पवार व सुत्रसंचलन भिमराव काकळे यांनी केले. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी प्रशांत टेके यांनी उपस्थितांचे आभार मानले.