September 11, 2025 1:17 pm

खरीप हंगाम सुरू असल्याने युरिया खताचा बफर स्टॉक रिलीज करावा – विवेकभैय्या कोल्हे यांची शासनाकडे मागणी

अहिल्यानगर मराठी न्यूज :प्रशांत टेके

कोपरगाव : पावसाने राज्यात काही प्रमाणात हजेरी लावल्याने अनेक भागांत शेतकरी बांधवांनी खरीप पिकांच्या पेरण्या सुरू केल्या आहेत. मात्र, पेरणीच्या निर्णायक टप्प्यावर युरिया खताचा तुटवडा जाणवत असून, वेळेवर खत न मिळाल्यास पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे शासनाच्या अखत्यारीतील युरिया बफर स्टॉकपैकी किमान ५०% स्टॉक तत्काळ रिलीज करण्यात यावा, अशी ठाम मागणी कोल्हे कारखाना अध्यक्ष व युवानेते मा. विवेकभैय्या कोल्हे यांनी केली आहे.

खरीप हंगामात युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. सध्या कोपरगाव तालुक्यातील अनेक भागांत शेतकरी पेरण्यांच्या कामात गुंतलेले असून खत टंचाईमुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. इतर तालुक्यांप्रमाणे कोपरगाव तालुक्यातही शासनाने एकूण युरिया बफर स्टॉकपैकी ५०% तरी किमान साठा वितरीत करावा, असेही कोल्हे यांनी स्पष्ट केले.

पिकांची योग्य वाढ व उत्पादनासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर खताचे नियोजन अत्यावश्यक असते. युरिया वेळेवर न मिळाल्यास हजारो हेक्टर क्षेत्रातील पीक संकटात सापडू शकते. त्यामुळे शासनाने तातडीने निर्णय घेऊन स्थानिक गोदामांतील बफर स्टॉक शेतकऱ्यांच्या गरजेसाठी खुला करावा, जेणेकरून खरीप हंगामात कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होणार नाही.

“शेतकऱ्यांची ही गरज वेळेवर पूर्ण झाली पाहिजे, अन्यथा संपूर्ण तालुक्यातील उत्पादन व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो,” असे म्हणत कोल्हे यांनी शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची विनंती केली आहे.शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि पेरणीच्या सुरळीत प्रक्रियेसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें