अहिल्यानगर मराठी न्युज : प्रशांत टेके
कोपरगाव तालुक्यातील वारी गावात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावातील शेतकरी कैलास गाडगे यांच्या शेतातील वस्तीवर मध्यरात्री घडलेली ही घटना असून, बिबट्याने घराजवळच असलेल्या फक्त दोन महिन्यांचं वासरू फाडून ठार केलं. जनावरे हंबरण्याचा आवाज ऐकून कैलास जागे झाले आणि बाहेर बिबट्याने शिकार करून वासरू ठार केलेले पाहून ते खुप घाबरले.त्यानंतर त्यांनी घरातील इतर सदस्यांना आवाज दिला. या गोंगाटाने बिबट्याने शिकार सोडून धुम ठोकली. बिबट्याचा भर वस्तीत वावर वाढल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गाडगे कुटुंबीय शेतातील वस्तीवर राहत असून, त्यांची घराजवळच अंगणात जनावरे बांधलेली होती. मध्यरात्री १.३० वाजता बिबट्याने वासरावर हल्ला करून काही क्षणांतच त्याने वासराची शिकार केली. गोठ्यातील अन्य जनावरे मात्र थोडक्यात बचावली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जनावरे पुरती घाबरून गेलेली असून अद्यापही त्यांना शांत करता आलेले नाही.
गावकरी सांगतात की, गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्याचे अनेक प्रसंग समोर आले आहेत. कुत्रे, शेळ्या, लहान वासरे यांची आधीही बिबट्याने शिकार केली असून, वनविभागाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. मानवी जीवितहानी अद्याप टळली असली तरी ही गंभीर बाब आहे.
शेतात वस्ती असलेल्या कुटुंबांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, मुलांना शाळेत पाठवण्यासही पालक घाबरत आहेत. “आमची मुलं शाळेत पायी किंवा सायकलने जातात. जर रस्त्यात बिबट्या समोर आला तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे,” असे गावातील शेतकरी वाल्मिक गोर्डे यांनी सांगितले आहे.
अनेक वेळा तक्रारी करूनही वनविभागाच्या उपाययोजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे.
गावकऱ्यांची मागणी : वनविभागाने तात्काळ पिंजरा बसवावा
ग्रामस्थांनी बिबट्याच्या वाढत्या धोक्याबाबत वनविभागाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. “दरवेळी बिबट्याने शिकार केल्यावर पिंजरा लावण्यासाठी मागणी होते, पण अंमलबजावणी होत नाही. आता तरी बिबट्याला पकडण्यासाठी तातडीने पिंजरा बसवावा, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात,” अशी मागणी शेतकऱ्यांमधुन करण्यात येत आहे.
शेतात आता वन्यप्राण्यांचा वाढता वावर, ग्रामस्थांची असुरक्षितता, आणि वनविभागाच्या उदासीनतेमुळे संतप्त वातावरण आहे. भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडण्याआधी प्रशासनाने वेळेवर पावलं उचलावीत, हीच ग्रामस्थांची एकमुखी मागणी आहे.