September 11, 2025 1:17 pm

श्रीरामपूरच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधांवर भर देणार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे

लोणी, दि. १२ – पायाभूत सुविधा सक्षम केल्याशिवाय शहराचा खरा विकास होत नाही. श्रीरामपूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासनाचा भर पायाभूत सुविधा पूर्ण करण्यावर राहील, असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

श्रीरामपूर येथे नगरपरिषदेच्या कामकाजाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी तथा नगरपरिषद प्रशासक किरण सावंत पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज शिवपुजे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, पायाभूत सुविधा मजबूत नसतील, तर शहराचा विकास होत नाही. नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी १७८ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले असून, नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. या कामांचे पर्यवेक्षण करण्यासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

श्रीरामपूरच्या विकासासाठी अनेक निर्णय घेण्यात आले. शेती महामंडळाची जमीन उपलब्ध करून ३ हजार घरकुले बांधण्यात येणार असून, या प्रकल्पात मूलभूत नागरी सुविधा पुरविल्या जाणार आहेत. हा घरकुल प्रकल्प राज्यातील सर्वोत्तम ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. श्रीरामपूरला झोपडपट्टीमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे.

नॉदर्न ब्रॅंच कालव्यावरील अतिक्रमणे हटवून तो भूमिगत करण्यात येईल. प्रवरा डावा कालव्याचे काम सुरू होणार असून, परिसराचे सुशोभीकरण करून व्यावसायिकांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल. अवैध पाणीचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामुळे श्रीरामपूर शहराचे वैभव वाढणार आहे. त्यामुळे छत्रपतींच्या पुतळ्यावर राजकारण करू नये. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येईल, शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

पालकमंत्री श्री.विखे पाटील म्हणाले, घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली बसविण्यात यावेत. पाणीपट्टी आणि घरपट्टी ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अतिक्रमणांवर कारवाई करावी. लाड पागे समितीच्या शिफारशींनुसार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नियुक्त्या, राजकीय फ्लेक्स बोर्ड हटवणे, सांडपाणी मिसळणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणे, अवैध धंद्यांवर नियंत्रण, संपूर्ण शहर सीसीटीव्ही कक्षेत आणण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.

शहरातील व्यापारी आणि उद्योजकांनी विकासासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रस्त्यांवरील भाजीपाला विक्री टाळण्यासाठी एकाच ठिकाणी भाजीपाला मार्केट स्थापन करण्याकडे नगरपालिकेने लक्ष द्यावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या.

यावेळी पालकमंत्र्यांनी श्रीरामपूर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. 

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें