September 11, 2025 1:20 pm

साखर उद्योगातील योगदानाबद्दल बिपीनदादा कोल्हे यांना शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, नवी दिल्लीचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अहिल्यानगर मराठी न्यूज : प्रशांत टेके

कोपरगाव : साखर उद्योगातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण उपक्रम व तांत्रिक उत्कर्षासाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांना शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन, नवी दिल्ली यांच्यावतीने देशपातळीवरील सर्वोच्च जीवनगौरव पुरस्कार (लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड) प्रदान करण्यात आला. काल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होऊन आज, २५ जुलै रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या एका भव्य समारंभात या पुरस्काराचे वितरण झाले.प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व दि शुगर टेक्नॉलॉजी असोशिएशनचे (STAI)प्रेसिडेंट संजय अवस्थी आणि यांच्या हस्ते मानपत्र बिपीनदादा कोल्हे यांना देऊन सन्मानित करण्यात आले

शंभर वर्षांहून अधिक काळापासून साखर उद्योगातील तांत्रिक व शाश्वत प्रगतीसाठी कार्यरत असलेली शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ही देशातील अग्रगण्य संस्था असून, प्रत्येक वर्षी साखर क्षेत्रात विशिष्ट योगदान दिलेल्या व्यक्तींचा गौरव करते. यंदाच्या २०२५ सालच्या पुरस्कारासाठी बिपीनदादा कोल्हे यांची निवड करण्यात आली होती.माजी मंत्री शंकरराव कोल्हे, बिपीनदादा कोल्हे आणि तिसरी पिढी कोल्हे कारखाना अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी साखर उद्योगात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे जी दखल देशात अनेक पातळीवर घेतली जाते.

बिपीनदादा कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध तांत्रिक व आर्थिक उपक्रम यशस्वीपणे राबवले. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी देशविदेशातील साखर तंत्रज्ञानाचा अभ्यास करून कारखानदारीत आधुनिकीकरण केले. इथेनॉल उत्पादन क्षेत्रात कोल्हे कारखान्याने देशात सर्वप्रथम आघाडी घेतली, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करत शेतकऱ्यांच्या बांधावर नव्या सुविधा पोहोचवल्या. नव्यिन्यतेचे धाडसी प्रकल्प राबविण्यात अग्रेसर असणारा संजीवनी उद्योग समूह त्यांच्या अभ्यासू आणि दूरदृष्टीच्या विचारांनी अधिक गरुडझेप घेतो आहे.

कोल्हे कारखाना हा साखर क्षेत्रातील पायलट प्रकल्पांचा केंद्रबिंदू ठरला असून, बदलत्या आर्थिक परिस्थितीतही बिपीनदादा कोल्हे यांनी नाविन्याचा सातत्यपूर्ण ध्यास घेत कारखान्याचे यशोमार्गावर नेतृत्व केले आहे. गेल्या २८ वर्षांपासून त्यांच्या सर्जनशील, दूरदृष्टीपूर्ण व समर्पित नेतृत्वामुळे साखर कारखानदारीतील त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.या पुरस्कारामुळे कोल्हे यांचे कार्य राष्ट्रीय स्तरावर गौरवले गेले असून, कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून एकूणच महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या अभिमानाचे हे क्षण असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

यावेळी समारंभासाठी माजी मंत्री जयंत पाटील,रणजित पुरी,एन. चिन्नप्पन, संभाजीराव कडू पाटील,डॉ. सीमा परोहा,कोल्हे कारखाना अध्यक्ष व इफको दिल्लीचे संचालक विवेकभैय्या कोल्हे आदीसह मान्यवर उपस्थित होते.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें