अहिल्यानगर मराठी न्यूज : चंद्रकांत वाखूरे
पाथर्डी :हत्राळ गावचे उपसरपंच तथा युवा सामाजिक कार्यकर्ते परमेश्वर टकले यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल “द युवा ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य” यांच्यातर्फे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे
या पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन अहिल्यानगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. शंकर मिसाळ (मुख्य अग्निशमन अधिकारी, अहिल्यानगर) होते. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास ताठे, पोलीस निरीक्षक गीते साहेब, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक अन्सार शेख, ज्येष्ठ पत्रकार कवी बाळासाहेब कोठुळे, ह.भ.प. कृष्णा महाराज ताठे आदी मान्यवर उपस्थित होते.
परमेश्वर टकले यांनी मागील १० ते १२ वर्षांपासून सामाजिक कार्यात सातत्याने सहभाग घेतला आहे. त्यांनी रस्ते, पाणी, शिक्षण, मराठा समाजासाठी आंदोलने, उपोषणे, मोर्चे, तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, वृक्ष लागवड, विविध महापुरुषांच्या जयंती अशा उपक्रमांमधून समाजासाठी भरीव योगदान दिले आहे.
याच कार्याची दखल घेत, द युवा ग्रामीण पत्रकार संघाचे ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब कोठुळे यांनी त्यांच्या नावाची शिफारस केली होती.
पुरस्कार मिळाल्याच्या निमित्ताने टकले म्हणाले, “हा सन्मान म्हणजे आजवरच्या सामाजिक कार्याची पावती आहे. यामुळे नव्या जोमाने जनतेसाठी कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
हत्राळ गावासह संपूर्ण पाथर्डी तालुक्यातून परमेश्वर टकले यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.