September 19, 2025 7:08 pm

जिल्ह्यात प्रथमच सुब्रतो मुखर्जी राज्यस्तर फुटबॉल कपचे उद्घाटन अभिमानाची गोष्ट – आमदार संग्राम जगताप

अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे

सुब्रतो कपमधून ऑलिंपिकसाठी फुटबॉलपटू घडावेत-जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया

अहिल्यानगर, दि. १२ – जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमुळे या खेळातील कौशल्ये व गुणवत्तेच्या खेळाडूंमध्ये देवाण-घेवाण होणार असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तर सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेतून जागतिक स्तरावरील ऑलिंपिक स्पर्धेसाठी फुटबॉलपटू घडावेत, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर, जिल्हा फुटबॉल संघटना, शांतीकुमार फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन व आय लव्ह नगर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील पहिल्या राज्यस्तरीय सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, अहमदनगर महाविद्यालयाचे प्राचार्य नोएल पारगे, रजिस्ट्रार हेमलता भिंगारदिवे, सचिव प्रदीप जाधव, खलील सय्यद, सोवियो वेगास, ऑलिंपिक संघटनेचे शैलेश गवळी, धीरज मिश्रा, फुटबॉल असोसिएशनचे सचिव रोनक फर्नांडिस आदी मान्यवर उपस्थित होते.

आमदार संग्राम जगताप म्हणाले, शालेय स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या खेळाडूंनी खेळात सातत्य ठेवले, तर त्यांच्या गळ्यात निश्चितच अनेक सुवर्णपदके चमकतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले, सुब्रतो मुखर्जी राज्यस्तर फुटबॉल कप ही राज्यातील महत्त्वपूर्ण फुटबॉल स्पर्धा आहे. राज्यभरातून आलेल्या आठ विभागातील विजेत्या खेळाडूंमधून उत्कृष्ट फुटबॉल खेळाचे प्रदर्शन पाहण्याची संधी सर्वांना मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाच्या बँडच्या माध्यमातून पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या स्पर्धेसाठी १५ वर्ष व १७ वर्षे वयोगटातील मुलांचे महाराष्ट्रातील आठ विभागातील २५६ खेळाडू, ३२ संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक आणि २५ पंच सहभागी झाले. फुटबॉल संघाच्या संचलन उपक्रमातून पाहुण्यांना अभिवादन करण्यात आले. सर्व विभागांच्या खेळाडूंच्या एकजुटीतून पाहुण्यांच्या शुभहस्ते स्पर्धेची क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.

प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे म्हणाले, “फुटबॉल हा जागतिक खेळ असून महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात नवीन खेळाडूंची पिढी या खेळाकडे आकर्षित होत आहे. विविध जिल्ह्यातून गुणवत्तेने पुढे आलेले खेळाडू निश्चितच देशाचे उज्ज्वल भविष्य आहेत,” असेही ते म्हणाले.

शंभूसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने शिवकालीन मर्दानी खेळ व शस्त्रास्त्रांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. राष्ट्रीय खेळाडू स्वराज सावंत याने खेळाडूंना क्रीडा संघभावनेची शपथ दिली.

मान्यवरांच्या शुभहस्ते आकाशात विविधरंगी फुगे सोडून स्पर्धेचे उद्घाटन झाले. शुभारंभाचा सामना अमरावती व कोल्हापूर या संघांमध्ये खेळवला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल बागुल यांनी केले, स्वागत क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी केले, तर आभार क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे यांनी मानले.

अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे व क्रीडा प्रबोधिनी या विभागातील संघ या स्पर्धेसाठी दाखल झाले असून १० ते १२ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा अहमदनगर महाविद्यालयाच्या प्रशस्त मैदानावर खेळवली जाणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील क्रीडा मार्गदर्शक संतोष वाबळे, क्रीडा अधिकारी प्रियंका खिंडरे, रमेश जगताप, तसेच फुटबॉल संघटनेचे पंच अभिषेक सोनवणे, संकेत बनसोडे, मनीष राठोड, सुमित राठोड, व्हिक्टर जोसेफ, जोनाथन जोसेफ, सचिन पाथरे, अभय साळवे, जेवियर स्वामी, राजेश अँथनी आदींनी परिश्रम घेतले.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें