अहिल्यानगर मराठी न्यूज :संपादक शहाजी दिघे
धानोरे प्रतिनिधी (अनिल वाकचौरे ) : पाथरे बुद्रुक, ता. राहता, जि. अहिल्यानगर: श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पाथरे बुद्रुक येथील इयत्ता दहावीच्या २००२-२००३ बॅचच्या विद्यार्थ्यांचा २२ वर्षांनंतरचा स्नेहमेळावा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला. या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांसोबत जुन्या आठवणींना उजाळा देत, मनोगते व्यक्त केली आणि शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
या स्नेहमेळाव्याचे विशेष आकर्षण म्हणजे माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी पाण्याचा आरो प्लांट सप्रेम भेट दिला. या भेटीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी उपलब्ध होणार असून, माजी विद्यार्थ्यांचा हा पुढाकार कौतुकास्पद ठरला. मेळाव्यात शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले.
२००२-२००३ च्या बॅचमधील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करत स्वतःचा ठसा उमटवला आहे. यामध्ये इंजिनीअर, डॉक्टर, वकील, शिक्षक, शेतकरी, व्यावसायिक आणि नोकरदार अशा विविध क्षेत्रांतील यशस्वी व्यक्तींचा समावेश आहे. शाळेने आणि शिक्षकांनी दिलेले संस्कार, मूल्ये आणि शिक्षण यांच्या जोरावर हे विद्यार्थी आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
या स्नेहमेळाव्याने माजी विद्यार्थ्यांना एकमेकांशी पुन्हा जोडले जाण्याची संधी मिळाली. शाळेच्या प्रांगणात आठवणींना उजाळा देताना सर्वांनी भविष्यातही शाळेच्या विकासासाठी योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. हा मेळावा सर्वांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.