अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
पाथरे (प्रतिनिधी) – राहाता तालुक्यातील पाथरे गावातील महालक्ष्मी मातेच्या मंदिराची दानपेटी फोडून अज्ञात चोरटयाने पेटीतील सुमारे ३० ते ३५ हजारांची रोकड चोरून नेली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, पाथरे गावात महालक्ष्मी मातेचे मंदिर आहे. नेहमीप्रमाणे मंदिराला रात्री कुलूप लावलेले होते. सकाळी मात्र मंदिराचे कुलूप तोडलेले दिसले व मंदिरातील दानपेटी गायब दिसली. त्यानंतर सर्वत्र पेटीचा शोध घेतला असता मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला चोरटयांनी ही दानपेटी चोरून आणल्याचे दिसून आले.
त्याठिकाणी ही दानपेटी फोडून त्यातील अंदाजे ३०-३५ हजार रूपये चोरून नेले. त्यानंतर सदर चोरटयांनी शेजारीच असलेल्या जिल्हापरिषद अंगणवाडीकडे आपला मोर्चा वळवला.
अंगणवाडीच्या दरवाजाचा लॉक तोडून अंगणवाडीत असलेले दोन टीव्ही चोरून नेले असल्याची माहिती मिळत आहे.आज दुपारी पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा केला असुन माग काढण्यासाठी श्वान पथकाला बोलविले असल्याचे सरपंच घोलप यांनी माहिती दिली