अहिल्यानगर मराठी न्यूज : शहाजी दिघे
नेवासा प्रतिनिधी : रामलीला मंगल कार्यालय, श्रीरामपूर रोड, नेवासा बु. येथे पंचायत समिती, नेवासा यांच्या वतीने महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभागांतर्गत “मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान” (दि. १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२५) यशस्वीपणे राबविण्यासाठी तालुका स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
यावेळीआमदार विठ्ठराव लंघे उपस्थित होते. त्यांनी उपस्थिततांशी संवाद साधत अभियानाची उद्दिष्टे, भूमिका व जबाबदाऱ्या याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांची कामगिरी अधिक कार्यक्षम होण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांचा तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर गौरव करणे हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी
सांगितले. “गाव समृद्ध झाले तरच राज्याचा सर्वांगीण विकास साधता येतो. यासाठी नेवासा तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबवून जिल्ह्यात व राज्यात आपला तालुका अग्रेसर राहील, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत,” असे आवाहन त्यांनी केले.
मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री मा. ना. श्री. जयकुमार गोरे आणि पालकमंत्री मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली हे अभियान निश्चितच यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यशाळेला शासकीय अधिकारी, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.