अहिल्यानगर मराठी न्यूज :शहाजी दिघे
राहूरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील मुळा नदी पात्रातून शासकीय वाळू विनापरवाना चोरी करून चोरटी वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राहुरी पोलिस स्टेशनला आणला.
याबाबतची हकीकत अशी की, शुक्रवार दि. १२ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वाघचौरे यांना अजय चितळकर (रा. स्टेशन रोड, राहुरी) हा टाटा कंपनीचे 709 मॉडेल वाहन वापरून मुळा नदी पात्रातून बेकायदेशीर वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या पथकाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले.
शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल सतीश पठारे, हेडकॉन्स्टेबल संजय गडेकर, सहाय्यक फौजदार तुळशीदास गीते व पंच यांच्या समक्ष मुळा नदी पात्रातून एक निळसर विटकरी रंगाचा टेम्पो येताना आढळला. पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला असता चालकाने वाहन रेल्वे पुलाखाली थांबवून अंधाराचा फायदा घेत पळ काढला. स्थानिकांकडून चौकशी केली असता चालकाचे नाव अजय चितळकर असल्याचे स्पष्ट झाले.
सदर टेम्पोच्या पाठीमागील हौद्यामध्ये विनापरवाना दीड ब्रास वाळू आढळली. त्याचा पंचनामा करून टेम्पो व वाळू जप्त करण्यात आली असून, एकूण जप्तीची किंमत सुमारे दोन लाख वीस हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल सतीश पठारे यांच्या फिर्यादीवरून अजय चितळकर रा . गौतमनगर ,राहुरी रेल्वे स्टेशन याच्या विरोधात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.