अहिल्यानगर सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत २०२५-२६ च्या रुपये ७०२ कोटी ८९ लाख अनुसूचित जाती योजनेअंतर्गत १४४ कोटी रुपये आणि आदिवासी उपयोजनेअंतर्गत ६५ कोटी ८९ लाख, अशा एकूण ९१२ कोटी ७८ लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता देण्यात आली. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.
एकूण प्रस्तावित आराखड्यापैकी १७५ कोटी ७२ लाख २५ हजार रुपये जिल्हा विकास आराखड्यासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. वित्त व नियोजन मंत्री यांचे अध्यक्षतेखाली होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीमध्ये जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण) एकूण ७०२ कोटी ८९ लाख रुपयांचा आराखडा सादर करण्यात येईल. तसेच बैठकीमध्ये एकूण १५० कोटी अतिरीक्त नियतव्ययाची मागणी करण्याचे निश्चित करण्यात आले.
जिल्ह्यात प्रथमच जिल्हा परिषद शाळांना प्रथमच वर्गखोल्यांसाठी निधी देण्यात आला आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून जिल्हा परिषद शाळांच्या चौथीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. शाळांमध्ये स्वच्छतागृह असावे याकडे विशेष लक्ष घ्यावे आणि त्यांची स्वच्छताही करण्यात यावी. कमी पटसंख्या असलेल्या शाळेजवळ असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना सामावून घेता येईल का याचा अभ्यास करावा, अशा विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी निधी देण्यात येईल.
बचतगटांच्या विकासासाठी आणि त्यांच्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी, बाजारपेठ मिळवून देण्यासाठी समितीची स्थापना करण्याबाबत विचार करण्यात येईल. विविध शासकीय योजनांची माहिती कार्यालयाबाहेर फलकावर प्रदर्शित करण्यात यावी. कार्यालय स्वच्छता, शून्य प्रलंबितता आणि ई कामकाजावर भर देण्यात यावा. कार्यालय परिसरातील अतिक्रमणे १०० दिवस कार्यक्रमात काढावी. सौर कृषी पंप स्थापित करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पैसे मागितले जात असल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
मंजूर प्रारूप आराखड्यात सर्वसाधारण योजनेअंतर्गत ग्रामीण विकास ३५ कोटी, ऊर्जा विकास ५० कोटी, कृषी आणि संलग्न सेवा ९९ कोटी २८ लक्ष ८४ हजार, पाटबंधारे व पूर नियंत्रण ३१ कोटी ८४ लक्ष ३६ हजार, उद्योग व खाण ४ कोटी ३० लक्ष, परिवहन १०९ कोटी, सामान्य आर्थिक सेवा ८९ कोटी २८ लक्ष ६७ हजार, सामाजिक सेवा २१३ कोटी ८७ लक्ष ६८ हजार, सामान्य सेवा १९ कोटी १५ लक्ष, इतर जिल्हा योजना १६ कोटी आणि नाविन्यपूर्ण योजनेसाठी ३५ कोटी १४ लक्ष ४५ हजार रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित करण्यात आला.
अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त विशेष कार्यक्रम
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त ३०० अंगणवाड्यांचे बांधकाम, ३०० जलस्रोतातील गाळ काढणे, ३०० गावे अतिक्रमणमुक्त करणे, पुरातन बारवांची दुरुस्ती, कन्या विद्यालयात सीसीटिव्ही बसविणे आदी कामे करण्यात येणार आहे. नेवासे येथे संत ज्ञानेश्वर सृष्टीचा आराखडा तयार करण्यात आला आहे, लवकरच तो शासनास सादर करण्यात येईल. अकोले, भंडारदरा परिसरात साहसी पर्यटन आणि वन पर्यटनाला चालना देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी, आमदार शिवाजीराव गर्जे, सत्यजित तांबे, मोनिका राजळे, आशुतोष काळे, डॉ. किरण लहामटे, अमोल खताळ, विठ्ठल लंघे, काशिनाथ दाते, हेमंत ओगले, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर आदी उपस्थित होते.