राज्यात रब्बी हंगामात गहू हे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. गहू पिकामध्ये प्रामुख्याने तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतो. देशामध्ये १९२० मध्ये हा रोग पहिल्यांदा आढळून आला.
गहू पिकात मुख्यत: तीन प्रकारचे तांबेरा दिसून येतात. पानावरील तांबेरा, स्ट्रीप तांबेरा, स्टेम तांबेरा. आजच्या लेखात तांबेरा या रोगाची लक्षणे, पोषक हवामान, रोग निर्माण होण्याची कारणे आणि नियंत्रणासाठी उपाय आदींविषयी माहिती घेऊ.
लक्षणे :
– रोगाची लक्षणे पाने आणि देठावर दिसतात. खोडावर आणि ओंबीवर फार तुरळक वेळेस लक्षणे दिसून येतात.
– सुरवातीला पिवळ्या रंगाचे गोल किंवा अंडाकार पुळी सारखे ठिपके पानावर दिसू लागतात. नंतर हे ठिपके मोठे होऊन त्यात बुरशीचे बीजाणू तयार होतात. हे ठिपके, पुळी मोठी झाल्यासारखे फुगतात व नंतर फुटतात. आतील बीजाणू त्यातून बाहेर येतात.
– ठिपके पानावर गंज आल्यासारखे भगव्या रंगाचे दिसतात.
– बुरशीचे बीजाणू सहज हाताला आणि कपड्यांना लागलेले दिसू शकतात.
– सुरवातीला वरील पानांवर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतो. जास्त प्रादुर्भावामध्ये पाने वाळून जातात.
रोगाची माहिती :
रोगाचे नाव ः पानावरील तांबेरा रोग (Leaf Rust / Brown rust )
रोगाचे कारण ः हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.
रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः पुक्सिनिया ट्रीटीसीना (Puccinia triticina)
बुरशीचे फायलम ः Basidiomycota)
परजीवी प्रकार ः Obligate parasite
नुकसान ः या रोगामुळे पिकाचे १० टक्के पर्यंत नुकसान होऊ शकते. प्रादुर्भावाची तीव्रता जास्त असल्यास, ३० ते ४० टक्के पर्यंत नुकसान होते.
पोषक वातावरण ः
साधारणपणे २० अंश सेल्सिअस तापमान, सलग तीन ते चार तास पानांवर दव साठून राहिलेले वातावरण या रोगास अनुकूल असते. दव जितके जास्त वेळ पानावर राहील, तितके रोगाचे प्रमाण जास्त राहते.
रोग कसा निर्माण होतो ः
या रोगाच्या बुरशीचे तंतू किंवा युरेडोस्पोर (Urediospores) हिवाळ्यात व उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत असतात. पोषक वातावरण निर्माण झाल्यानंतर ही बुरशी युरेडोस्पोर (Urediospores) बीजाणू तयार करतात. हे बीजाणू वारा किंवा पाणी यांच्या माध्यमातून गहू पिकापर्यंत पोचतात. त्यानंतर पुढील ३० मिनिटांमध्ये त्यांचे अंकुरन होते. बीजाणू पर्णरंध्रामधून जर्मट्यूबच्या साहाय्याने झाडामध्ये प्रवेश करतात.
या बिजाणूंपासून ‘प्राथमिक लागण’ होते. लागण झाल्यानंतर ८ ते १० दिवसांनी रोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात होते. अगोदर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाची पुळी सारखी लक्षणे पानांवर दिसतात, याला ‘युरेडिनीया किंवा युरेडीओसोरी’ असे म्हणतात. यामध्ये बुरशीचे बीजाणू (Urediospores) तयार होतात. हे बीजाणू रोगाचा पुढील प्रसार करतात. याला ‘दुय्यम लागण’ असे म्हणतात. हे बीजाणू एका पानापासून दुसरीकडे वारा, पाऊस आणि कीटकांमार्फत जातात.
सूक्ष्मदर्शिकेखाली काय दिसते ?
सूक्ष्मदर्शिकेखाली आपण या रोगाचे बीजाणू पाहून रोग निश्चिती करू शकतो. हे बीजाणू पिवळसर भगव्या रंगाचे गोलाकार असतात.
नियंत्रणाचे उपाय ः
– लागवडीसाठी रोगमुक्त बियाणांची निवड करावी.
– पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया अवश्य करावी.
– रोग प्रतिकारक्षमता उत्तम असलेल्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी.
– पिकाची पाने ओली राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
– रोगग्रस्त झाडे त्वरित काढून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.
– नत्रयुक्त खतांचा वापर कमी करावा.
– जमिनीवर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.
– शिफारस केलेली बुरशीनाशकांचा वापर करावा.
शिफारस केलेली बुरशीनाशके ः
– क्रेसॉक्झिम मिथाइल (४४.३ टक्के एससी)
– मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूपी)
– टेब्युकोनॅझोल (३८.३९ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)
– झायनेब (७५ टक्के डब्ल्यूपी)
– ॲझोक्सिस्ट्रोबीन (१८.२ टक्के) अधिक डायफेनकोनॅझोल (११.४ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)
– ॲझोक्सिस्ट्रोबीन (११ टक्के) अधिक टेब्युकोनॅझोल (१८.३ टक्के डब्ल्यू/डब्ल्यूएससी)
– फ्ल्युझापायरॉझॅड (१६७ ग्रॅम/लिटर) अधिक पायरॅक्लोस्ट्रोबीन (३३३ ग्रॅम/लिटर एससी)