September 11, 2025 10:48 am

शिर्डी साई संस्थानातील कर्मचाऱ्यांचे दुहेरी हत्याकांड

शिर्डी :प्रतिनिधी

शिर्डी : राज्यात वाढती गुन्हेगारी कमी करणे हे सरकारसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. दररोज राज्यातील विविध भागामध्ये गुन्हे घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न निर्माण झलेले आहेत. वाढत्या गुन्हेगारीवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कठोर पाऊले उचलणार असे बोलले जात असतानाच, आता महाराष्ट्रातील प्रसिद्ध अशा शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांड घडल्याची माहिती समोर आली आहे.

एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्या दोन जणांचा मृत्यू झाला आहे, ते दोघेही शिर्डी साई संस्थानातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर शिर्डीत भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता.03 फेब्रुवारी) पहाटे 4 ते 5.30 वाजताच्या दरम्यान विमानतळ रोडवर या तिन्ही घटना घडलेल्या आहेत. चोरीच्या उद्देशाने या घटना घडल्या असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी चोरीच्या उद्देशाने तिघांना वेगवेगळ्या वेळेत अडवून त्यांच्याकडील रक्कम हिसकावून घेतली.

हे हल्लेखोर इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी निरपराध नागरिकांवर चाकूने असंख्य वार केले. यामध्ये दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर एक ग्रामस्थ गंभीर जखमी झाला. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सुभाष घोडे आणि नितीन शेजुळ अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, कृष्णा देहरकर नावाचा तरुण गंभीर जखमी झाला आहे. साई संस्थानचे दोघे कर्मचारी आणि शिर्डीतील एका तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, या घटना घडल्यानंतर, घटनेत दोघांचा जीव गेल्यानंतरही पोलिसांनी याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पोलिसांनी या घटना अपघात असल्याचे सांगितल्याने मृतांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. जोपर्यंत आरोपींना अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका मृतक घोडे याच्या नातेवाईकांनी घेतली आहे.

तर पोलिसांना मर्डर आणि अपघातातील फरक कळत नसेल, तर अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्याकडून सांगण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांचा संताप पाहून पोलिसांनी आरोपींना शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे.

अधिक वाचा

Cricket Live Score

Corona Virus

Rashifal

और पढ़ें