राहूरी :प्रतिनिधी
राहूरी – महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम हा जनतेच्या हक्कांना जपणारा आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिनियमांचे तंतोतंत पालन करुन जनतेला विहित कालावधीमध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरुण उंडे, तहसीदार शरद घोरपडे उपस्थित होते.
श्री. कोळेकर म्हणाले, विविध शासकीय कार्यालयात कामांसाठी होत असलेली गर्दी कमी करुन फेसलेस कार्यालय करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यादृष्टीने अनेक सेवा ऑनलाइन पद्धतीने सामान्यांना उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येत आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला अधिक महत्त्व देऊन त्यांच्याशी संबंधित विषयांची माहिती प्रशिक्षणातून जाणून घेण्याची गरज आहे. कार्यालयांमध्ये उपलब्ध मनुष्यबळाला प्रशिक्षणाच्या माध्यमातून सक्षम करण्यासाठीही प्रशासनामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत. सार्वजनिक व सामाजिक कार्यात अग्रभागी राहणाऱ्या सक्षम प्रशासनाची फळी तयार करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. राहाताचे तहसीदार अमोल मोरे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत जनतेला उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.कार्यक्रमाला विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.